मुंबई, 29 सप्टेंबर: बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनशी निगडीत असलेल्या बातम्या रोजच समोर येत आहेत. त्यामुळे ड्रग्ज आणि त्याच्याशी संबंधित विश्वाबाबत आता सामान्य माणसांची उत्सुकता वाढत चालली आहे. MX player वर बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनशी संबंधित असलेली बेवसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आत्महत्या त्यानंतर रिया चक्रवर्तीला झालेली अटक, त्यानंतर सारा अली खान (Sara Ali Khan)पासून बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची झालेली चौकशी अशा घडामोडींमुळे बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरण सध्या रोज चर्चिलं जात आहे. एमएक्स प्लेअरवरच्या वेबसीरिजचं नाव ‘हाय’ असं आहे. ‘हाय’(HIGH) ही कथा आहे ड्रग अडिक्ट असलेल्या शिवा माथूरची (विवेक ओबेरॉय) . शिवा माथूर आपलं आयुष्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर नशा मुक्ती केंद्रामध्ये उपचारही सुरू आहेत. डॉ. रॉय (प्रकाश बेलवाडी) आणि 2 ज्युनिअर डॉक्टर्स श्वेता आणि नकुल हे नशामुक्ती केंद्र चालवत असतात. नशामुक्ती केंद्रात जाऊन शिवा माथूरचं आयुष्य पूर्वपदावर येणार की आणि कोणत्या संकटात शिवा ओढला जाणार हे यात दाखवलं आहे. अनेक रहस्यमय घटनांमुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा दिर्ग्दशकांनी वर्तवली आहे. निखिल राव यांनी या वेबसीरिजचं दिर्ग्दशन केलं आहे.‘हाय’ (High) येत्या 7 ऑक्टोबरला रीलिज होणार आहे. याचा ट्रेलर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बडे मासे NCBच्या गळाला लागले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांचं करिअर यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. केवळ मोठमोठे सेलिब्रिटीच नाही तर अनेक सेलिब्रिटी मॅनेजर आणि पीआर क्षेत्रात असणारी माणसंही ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकण्याची शक्यता आहे.आता NCBच्या पुढील तपासात काय समोर येईल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.