मुंबई, 19 मार्च: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’च्या रिलीजची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. होळी (Holi 2022) च्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी ‘बच्चन पांडे’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. निर्मात्यांना चित्रपटाकडून चांगल्या कमाईची अपेक्षा होती, म्हणूनच निर्मात्यांनी होळीच्या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, मात्र बच्चन पांडेचा सामना सध्या प्रेक्षकांची पहिली पसंत ठरलेल्या चित्रपटाशी होत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) जो सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या ‘बच्चन पांडे’कडून पहिल्या कमाईच्या दिवशी चांगला गल्ला (Bachchan Paandey BO Collection Day 1) जमेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. हा सिनेमा पहिल्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही, कारण प्रेक्षकवर्ग द कश्मीर फाइल्सला अधिक पसंती देत आहे. पहिल्या दिवशी बच्चन पांडेची 13.25 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवसाचा हा आकडा चांगला जरी असला, तरी द कश्मीर फाइल्सपेक्षा अनपेक्षितपणे कमीच आहे. शुक्रवारचा दिवस ‘द कश्मीर फाइल्स’साठी थिएटरमध्ये आठवा दिवस होता. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ने (The Kashmir Files Box Office Collection) 22 कोटी रुपये कमावले आहेत. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमारचा ‘अॅक्शन अवतार’ पाहायला मिळणार आहे.
पहिल्या दिवसांच्या 13.25 कोटींच्या ओपनिंगनंतर बच्चन पांडे पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई अक्षय कुमारच्याच सूर्यवंशीने 26.29 कोटींची कमाई केली होती. हे वाचा- द काश्मीर फाइल्सनंतर कंगनासह विवेक अग्निहोत्री करणार सिनेमा, लवकरच होणार घोषणा? अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा बॉक्स ऑफिसवर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’शी सामना करत आहे. या सिनेमाने सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ला टक्कर दिली आहे आणि आता हा सिनेमा ‘बच्चन पांडे’ला मात देताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी जितकी कमाई केली आहे, तितकी कमाई बच्चन पांडेने रिलीजच्या पहिल्या दिवशी केलेली नाही. त्यामुळे निर्मात्यांनाही मोठा झटका बसला आहे. बच्चन पांडेला अपेक्षेप्रमाणे स्क्रीन्स देखील उपलब्ध केलेले नाही आहेत. कारण बहुतांश स्क्रीन्सवर 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘द कश्मीर फाइल्स’ दाखवण्यात येत आहे.
एवढं कमी बजेट असतानाही विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई याच वेगाने सुरू राहिली तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1975 साली एकूण खर्चाच्या वीसपट कमाई करणारा ‘जय संतोषी माँ’चा विक्रमही मोडू शकतो. ‘द कश्मीर फाइल्स’हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून 1990 साली काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांचा विस्थापनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumar), भाषा सुंबली (Bhasha Sumbli), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), पुनीत इस्सर (Puneet Issar), मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), अतुल श्रीवास्तव (Atul Srivastav) आणि पृथ्वीराज सरनाईक (Prithviraj Sarnaik) अशी तगडी स्टार कास्ट आहे.