मुंबई, 29 डिसेंबर: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमी खूप अॅक्टिव्ह असतात. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सतत काहीना काही शेअर करत असतात. यामध्ये स्वतःचा फोटो, सुविचार किंवा एखादी कविता ते शेअर करत असतात. अशा कवितांवर त्यांना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. अलीकडेच बिग बी यांनी ट्विटरवर एक कविता शेअर केली होती. ही कविता शेअर करताना त्यांनी एक मोठी चूक केली होती. यामुळे त्यांना संबंधित महिलेची हात जोडून सोशल मीडियावर माफी मागावी (Amitabh Bachchan apologises to woman)लागली आहे. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी स्वत: चा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांच्या हातात एक चहाचा कप धरलेला आहे. ट्विटरवर त्यांनी या फोटोसोबत एक सुंदर कविता देखील शेअर केली होती. अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटर वॉलवर ही कविता पाहिल्यानंतर, तिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेनं ती कविता त्यांनी लिहिली असल्याचा दावा केला. या कवितेचं श्रेय (Credit)त्यांना मिळायला पाहिजे असं तिनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं.
तिशानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की ‘सर, तुमच्या ट्वीटर वॉलवर माझी कविता दिसणं माझ्यासाठी खुपच कौतुकास्पद आहे. पण त्या कवितेसोबत माझं नाव असतं तर माझा आनंद द्विगुणित झाला असता. तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत,’ तिशाची टिप्पणी वाचल्यानंतर बिग बींनी लिहिलं की, या ट्विटचं श्रेय @TishaAgarwal यांना द्यायला हवं. ही कविता कोणाची आहे? हे मला माहित नव्हतं. कोणीतरी मला ही कविता पाठवली. मला वाटलं की, ही कविता फार चांगली आहे आणि ट्वीटरवर पोस्ट केली पाहिजे. यानंतर बॉलिवूडच्या महानायकांनी हात जोडलेल्या इमोजीसह माफी मागितली आहे.
अमिताभ यांची माफी मागितलेली पोस्ट पाहिल्यानंतर तिशानं लिहिलं की, धन्यवाद सर, तुमच्या मोठेपणाबद्दल. मला तुमच्याकडून माफी नाही तर आशीर्वाद हवा होता. तुमचा हा आशीर्वाद, आता माझा अभिमान आहे. त्यानंतर तिशानं आणखी एक ट्वीट केलं, ज्यामध्ये तिनं म्हटलं की, ‘सर, तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद, तुमच्या तुमच्या ट्वीटर वॉलवर माझं नाव दिसणं, हा माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे!
अलीकडेच अमिताभ बच्चन आयुष्मान खुरानासोबत ‘गुलाबो-सीताबो’ या चित्रपटात दिसले आहेत. ब्रह्मास्त्र, चेहरे आणि झुंड या आगामी चित्रपटांत अमिताभ बच्चन झळकणार आहेत.