जयपूर 01 जुलै : राजस्थानच्या (Rajasthan) मेवातमधील (Mewat) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यातलं चुल्हेडा (Chulheda) हे गाव साधारण दशकभरापूर्वी अगदी एखाद्या खेडेगावासारखंच होतं. म्हणजेच गावातली घरं कच्ची होती. गावातल्या लोकाचं राहणीमान अगदी साधं होतं. वाहनांची संख्या खूपच कमी होती. गेल्या पाच वर्षांत या गावाचा जणू कायापालट होऊ लागला आहे. या गावात पक्की घरं मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहेत. गाड्यांची वर्दळ वाढली आहे. या वर्णनावरून, हे गाव विकासाच्या वाटेवर आहे, असं वाटू शकतं. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. सुमारे 1200 लोकवस्तीच्या या गावात केवळ तीन तरुण सरकारी नोकरीत आहेत. एकजण लष्करात आहे, एक पोलिसात आणि एक शिक्षक आहे. बहुतांश लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात किंवा मजुरीवर दगड फोडण्याचं काम करतात. पण या गावातले अनेक तरुण वाममार्गाला लागले आहेत. अवैध उद्योगधंदे करून ही तरुणाई बक्कळ पैसा मिळवू लागली आहे. त्यातला महत्त्वाचा धंदा म्हणजे सेक्सटॉर्शन (Sextortion) आणि ऑनलाइन फसवणूक (Online Fraud). ‘दैनिक भास्कर’ने याबद्दलचा विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. भरतपूरमधल्या खोह पोलीस स्टेशनच्या (Khoh Police Station) कार्यक्षेत्रातल्या बहुतेकशा गावांतले तरुण सेक्सटॉर्शन आणि ऑनलाइन फसवणुकीचा उद्योग करण्याच्या जाळ्यात सापडले आहेत. या जाळ्यात लोकांना फसवून त्यांच्याकडून खंडणीच्या रूपात प्रचंड पैसा उकळला जातो आहे. त्यापैकीच एक गाव म्हणजे चुल्हेडा. या गावात मेवाती लोकसंख्या जास्त असून, ते स्वतःला मेव मुसलमान मानतात. गावाच्या लौकिकाबद्दल विचारलं असता, ‘पूर्वी ज्या लोकांना घरावर छप्पर घालणं मुश्किल होतं, ते आज घरांवर संगमरवर लावत आहेत. ज्यांना दोन वेळचं जेवणही मिळणं अवघड होतं, ते कोल्ड्रिंकवर पैसा उडवत आहेत. कोणत्याही योग्य मार्गाने अचानक असा पैसा मिळूच शकत नाही,’ असं मत एका वयोवृद्ध व्यक्तीने व्यक्त केलं. त्याने आपलं नाव सांगण्यास मात्र नकार दिला. कोणी कोणाला फसवलं? मुंबईतील अनोखी Love Story; प्रकरण पाहून पोलिसही बुचकळ्यात राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या मेवात प्रांतातल्या गावांना फसवणुकीच्या धंद्यांचा इतिहासच आहे. पूर्वी पितळेला सोनं सांगून विकण्यासारखे उद्योग केले जायचे. इंटरनेट आल्यानंतर ऑनलाइन, कॅशलेस पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले. आता ते सेक्सटॉर्शनपर्यंत पोहोचलं आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ व्यक्तीने दिली. गावात कोणीही या विषयाबद्दल बोलायला तयार नाही किंवा बोललंच तर स्वतःची ओळख सांगायला तयार नाही. एका दगड फोडणाऱ्या युवकाने सांगितलं, की माझ्या वयाच्या अनेक युवकांनी गेल्या वर्ष-दीड वर्षात मोठी संपत्ती कमावली आहे. काही जणांनी गावात फसवणुकीचे प्रकार होत असल्याच्या वृत्तास नकार दिला आणि जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आणि त्यात पोलिसांचा हात असल्याचंही एक-दोघांनी सांगितलं. मात्र त्यांना स्पष्टपणे विरोध झाला नसला, तरी अनेकांनी त्यांच्या विरोधातली मतं व्यक्त केली किंवा तसे संकेत दिले. ‘भास्कर’च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी काही लोक वस्तू स्वस्त देण्याची ऑनलाइन जाहिरात देऊन फसवायचे. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढले आहेत. फसवणुकीच्या (Fraud) प्रकारासाठी पूर्वीपासूनच ही गावं प्रसिद्ध असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी इथल्या बेरोजगार तरुणांना (Unemployed Youth) जास्त पैशांचं आमिष दाखवून या धंद्यात ओढून घेतलं. भावानं बहिणीसाठी प्रेमानं जेवण पाठवलं घरी, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार या तरुणांना मोबाइल आणि सिमकार्ड दिलं जातं. ते तरुण कोणत्या तरी तरुणीच्या नावाने खोटी सोशल मीडिया प्रोफाइल्स (Fake Social Media Profiles) तयार करतात, अनेकांशी सेक्स चॅट (Sex Chat) करतात आणि त्यांना व्हिडिओ कॉल करायला भाग पाडतात. कोणी त्यांच्या या जाळ्यात सापडलंच, तर स्क्रीन रेकॉर्डरच्या सहाय्यानं व्हिडिओ तयार केला जातो. नंतर दुसऱ्या टीमचं काम सुरू होतं. ती टीम संबंधित व्यक्तीला फोन करून न्यूड व्हिडिओ (Nude Video) रेकॉर्ड झाल्याचं सांगते आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करतात. पैसे मागवण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडण्याचं कामही या तरुणांची एक टीम करते. खंडणी वसूल झाल्यानंतर त्यातली 10 - 15 टक्के रक्कम पहिल्या टीममधल्या तरुणांना दिली जाते. त्यांना बाकीच्या टीम्सबद्दल किंवा किती वसुली झाली याबद्दल काहीच माहिती नसतं. या गावांतल्या बहुतांश तरुणांकडे पहिल्या फळीतलं काम असतं. त्यामुळे पोलीस कारवाई झाली, तर पहिल्यांदा हेच तरुण पकडले जातात. कारण पोलीस हेच नंबर तपासतात. बाकीच्या लोकांविरुद्धचे पुरावे शोधून त्यांच्यावर कारवाई करणं अवघड असतं, असं खोह पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण एकूण प्रकरणांपैकी केवळ 10 ते 12 टक्केच प्रकरणांत तक्रारी दाखल केल्या जातात. बाकीच्या राज्यांतल्या काही पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा अशा प्रकरणांत इथल्या पोलिसांची मदत मागितली आहे. तरुणाई या वाईट कामाच्या जाळ्यात अडकल्याने गावातल्या आर्थिक उलाढाली वाढत असल्याचं दिसत असलं, तरी पुढची पिढी वाईट मार्गाला लागल्याचं दुःख तिथल्या अनेकांच्या चेहऱ्यावर दिसतं.