कानाला फोन लावून एकटाच बोलत गावभर भटकायचा. अंगणात उभा राहून जोरजोरात किंचाळायचा.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 9 जून : शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं, असं तज्ज्ञमंडळी वारंवार सांगतात. यासंदर्भातच छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरबा जिल्ह्यात एका मनोरुग्णाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुलाराम हा 23 वर्षीय तरुण कामाच्या शोधात जांजगीरहून बालकोनगरात आला होता. कामधंद्यासाठी काही दिवस आपल्या बहिणीकडे राहायचं त्याने ठरवलं होतं. त्याठिकाणी त्याला कामही मिळालं. तो प्रामाणिकपणे दररोज कामावर जाऊ लागला. याबाबत त्याची बहीण विशाखाही आनंदात होती. मात्र एक दिवशी मित्रांसोबत कामासाठी खरसिया गावात गेलेला असताना तुलारामची तब्येत अचानक बिघडली. त्याच्या मित्रांनी त्याला बसमध्ये बसवलं. बहिणीच्या घरी सुखरूप पोहोचल्यानंतर काहीतरी वेगळंच घडलं.
तुलाराम आधीचा तुलाराम अजिबात राहिला नव्हता, तर तो एकटाच बडबडू लागला होता. कानाला फोन लावून एकटाच बोलत गावभर भटकायचा. अंगणात उभा राहून जोरजोरात किंचाळायचा. त्यावेळी त्याला डॉक्टरकडे न नेता भूतबाधा झाली असावी या संशयातून विशाखाने मांत्रिकाकडे नेलं आणि झाडूने झाडून आणलं. परंतु त्याने काही फरक पडला नाही. उलट तुलारामची तब्येत आणखी बिघडली. Pune News : आई भारतीय, तर बाप पाकिस्तानी; पण पुण्यातील तो तरुण जामीन मिळाला तरीही तुरुंगातच! एका रात्री 2 वाजता विशाखाने उठून पाहिलं, तर तुलाराम त्याच्या बिछाण्यात नव्हता. शोधाशोध केल्यानंतर गावातल्या कालव्याजवळ त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. भावाचा मृत्यू झाल्याचं पाहून विशाखाने हंबरडा फोडला. तर, याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली, पोलिसांना हा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने त्यांनी याप्रकरणी 174 सीआरपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.