दुचाकीचा धक्का लागल्याचा आला राग
विजय देसाई, प्रतिनिधी पालघर, 8 जुलै : नालासोपारा भागात किरकोळ कारणातून एका तरुणाचा जीव गेल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीच्या आरशाचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध नालासोपारा पोलीस करत आहेत. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणारे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रविवारी संध्याकाळी रोहीत यादव (वय 20) आणि विकेश चौधरी हे 2 तरुण दुचाकीवरून नालासोपारा पूर्वेला जात होते. सव्वा चारच्या सुमारास नालासोपारा उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला दुसर्या एका दुचाकीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीच्या आरशाला लागला. त्या दुचाकीवर 3 तरुण होते. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाचा - सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, कुटुंबीयांनी मृतदेह नदीत सोडला, कारण जाणून बसेल धक्का दुचाकीवर असलेल्या तिघा आरोपींनी या दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असताना कुणी मधे पडले नाही. मारहाणीत रोहीत यादव याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरीत नालासोपारा पुर्वेला असलेल्या पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत रोहीत हा नालासोपारा पुर्वेच्या संतोष भुवन येथे राहणारा होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा - माणूस की राक्षस? पत्नीची क्रूर हत्या, मेंदू चपातीत भरुन खाल्ला, कवटीचा अॅश ट्रे दुचाकी ओव्हरटेक करताना मयताच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला. यावरून वाद होऊन त्याला मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.