मासेमारीच्या जाळ्यात अडकला मृतदेह
मुंबई 05 जुलै : अर्नाळा बीचजवळ मासेमारीच्या जाळ्यात असं काही अडकलं की थेट पोलिसांनाच फोन करण्यात आला. मंगळवारी सकाळी एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. निर्मला प्रकाश झिरवा असं या मृत महिलेचं नाव असून ती विरारमधील एकता पाडा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांना विकी अनिल पागी (वय 27) या मच्छिमाराचा फोन आला. मच्छिमाराने पोलिसांना माहिती दिली की, तो आपलं मासेमारीचं जाळं बाहेर काढत असताना त्याला त्यात एका महिलेचा हात अडकलेला दिसला. पोलिसांनी पुढे सांगितलं, की विकी पागी यांनी स्थानिकांना मदतीसाठी बोलावलं आणि काही मिनिटांतच त्यांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढून पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पर्यटकांचं आकर्षण ‘आंबोली घाट’ बनतोय मृतदेह फेकण्याचं ठिकाण, नेमकं काय घडलं? महिलेचा मृतदेह प्राथमिक तपासणीसाठी संजीवनी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाची तपासणी केली असता महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. मृत्यूबाबत काहीही संशयास्पद नसल्याचंही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्नाळा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “तपास केल्यावर आम्हाला आढळलं, की निर्मला झिरवा ही महिला मच्छीमार होती आणि ती सकाळी समुद्रकिनाऱ्यावर जायची. सोमवारी ती सकाळी 6 वाजता घरातून निघाली होती आणि परत आलीच नाही. त्यानंतर निर्मलाचा पती प्रकाश याने पोलिसात जाऊन ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती." महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला माहिती दिली. यानंतर त्याने रुग्णालयात पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली.