भारतात लाँच होणार यू-ट्यूबचं 'हे' फीचर; कंटेंट क्रिएटर्सना मिळणार कमाईचं आणखी एक साधन
मुंबई, 21 डिसेंबर : मोठ-मोठ्या सेलिब्रिटींना एक इन्स्टाग्राम पोस्ट करण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळतात, याबाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी पैसे कमवतात. सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य नागरिकही घरबसल्या अशाप्रकारे पैसे कमवू शकतात. यासाठी तुम्हाला यू-ट्यूब या व्हिडिओ प्लॅटफॉर्मची मदत होते. या ठिकाणी फक्त व्हिडिओ अपलोड करून पैसे मिळवता येतात. भारतमध्ये अशा काही व्यक्ती आहेत, ज्या यू-ट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतात.
सध्या यू-ट्यूबवर कमाईसाठी आठ प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. पण, आता गुगल ही कंपनी यू-ट्यूब युजर्सना पैसे कमवण्यासाठी आणखी एक पर्याय देत आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्सना याचा फायदा होईल. गुगल आणि यू-ट्यूबनं नुकतीच ‘कोर्सेस’ या फीचरची घोषणा केली आहे. येत्या काळात ते रिलीज केलं जाईल.
हे ही वाचा : Twitter ने काढलेले कर्मचारी बदला घेणार, एलन मस्कना जोरदार धक्का देणार!
सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल ‘कोर्सेस’ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू केलं जाऊ शकतं. कंपनीने याच्या लाँचिंगच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती किंवा टाइमलाईन अद्याप शेअर केलेली नाही. कंपनी यू-ट्यूब कोर्सेसमधून नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ‘गुगल फॉर इंडिया’ च्या एका इव्हेंटदरम्यान कंपनीनं या फीचरबद्दल सांगितलं आहे. गुगल सध्या निवडक भागीदार आणि लेखकांसह याची चाचणी करत आहे. सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल कोर्सेसचं बीटा टेस्टिंग सुरू आहे.
गुगल इव्हेंटदरम्यान यू-ट्यूब इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ईशान जॉन चॅटर्जी यांनी सांगितलं की, कोर्सेस हे फीचर फक्त दक्षिण कोरिया, भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुरू केलं जाईल. त्याच्या मदतीनं युजर्स सहजपणे स्वतःची कौशल्यं वाढवू शकतात. ते पुढे म्हणाले की, डिजिटल शिक्षणाशी संबंधित कंटेंटमधून कमाई करायची आहे की नाही, हे सर्वस्वी कंटेंट क्रिएटरच्या निर्णयावर अवलंबून असेल. जर त्यांना फायनॅन्शिअल रिवॉर्ड मिळवायची असतील, तर त्यांना त्यासाठी लवकरच पर्याय मिळेल.
हे ही वाचा : लॅपटॉप घेण्याआधी फक्त एक गोष्ट चेक करा; तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल
यू-ट्यूब आपलं नवीन कोर्सेस हे फीचर चार प्रकारांमध्ये लाँच करणार आहे. डिजिटल स्कील्स, आंत्र्यप्रेन्युअरशीप, प्रोफेशन आणि पर्सनल पॅशन या चार प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. यू-ट्यूब प्रोड्युसर्स पीएनजी आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. यामुळे ते शिकवत असलेल्या अभ्यासक्रमाचं स्पष्टीकरणदेखील युजर्सना उपलब्ध होईल.
यू-ट्यूब हे भारतातील शक्तिशाली डिजिटल व्यासपीठ आहे. अनेक प्रतिस्पर्धी असूनही या प्लॅटफॉर्मचं वर्चस्व कायम आहे. मनोरंजन आणि रोजगार निर्मिती दोन्ही हेतू यातून साध्य होत आहेत.