मुंबई, 19 डिसेंबर : एलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीवरून भरपूर वाद झाला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी अखेर ट्विटर खरेदीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतरही मस्क त्यांच्या अनेक निर्णयांमुळे सतत चर्चेत राहिले. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर लगेचच काही दिवसांत मोठी नोकरकपात केली. कंपनीतले अनेक नियमही बदलले. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. आता ट्विटरमधून काढलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वतःचं एक अॅप विकसित केलंय. जानेवारीमध्ये ते लाँच होणार आहे. ट्विटरला पर्याय म्हणून स्पिल नावाचं हे अॅप तयार केलं जाणार आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यात बदल करण्याचं एलॉन मस्क यांनी ठरवलंय. ते आता ट्विटर 2.0 तयार करत आहेत. त्याचवेळी ट्विटरला पर्याय म्हणून कंपनीतून काढून टाकलेले दोन कर्मचारी स्पिल नावाचा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित करत आहेत. अल्फान्झो फोनेझ टेरेल आणि डिव्हेरीस ब्राउन यांना नोव्हेंबरमध्ये नोकरकपातीवेळी कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हापासूनच ते स्पिल नावाच्या नवीन अॅपवर काम करत आहेत. कृष्णवर्णीय असल्यानं गेल्या काही वर्षांपासून ट्विटरमध्ये काम करताना अवघडल्यासारखं वाटायचं, असं TechCruch ला दिलेल्या मुलाखतीत स्पिलच्या दोन्ही संस्थापकांनी म्हटलंय. आपल्या संस्कृतीसाठी प्रभावी कंटेंट निर्माण करून कृष्णवर्णीय कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची त्यांची इच्छा होती. याच मानसिकतेतून स्पिलचा जन्म झाला. ट्विटर सोडण्याच्या आधीपासूनच काही कृष्णवर्णीय महिला क्रिएटर्ससोबत त्यांचं बोलण सुरु होतं. ते कसा पैसा कमावतात, त्यांना कोणत्या सोशल मीडिया अॅपची मदत होते, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. स्पिल सगळ्यांसाठी असून नवीन ट्रेंड सेट करणाऱ्या एका कल्चर ड्राईव्हर्ससाठी आम्ही काम करतो आहोत, मात्र त्यांच्याकडे फारसं पाहिलं जात नाही व त्यांना पुरेसा पैसाही पुरवला जात नाही, असं टेरेल यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तो ब्लॅक क्रिएटर्स, क्वीर क्रिएटर्स आणि अमेरिकेच्या बाहेरच्या काही प्रभावी क्रिएटर्सबाबत बोलत असल्याचंही त्यानं स्पष्ट केलंय. टेरेलनं ट्विटरचा सोशल आणि एडिटोरियल ग्लोबल हेड म्हणून काम केलंय, तर ब्राउननं प्रोजेक्ट मॅनेजर लीड म्हणून काम पाहिलंय. आता ट्विटरला पर्याय म्हणून स्पिल नावाच्या अॅपवर ते काम करताहेत. हे नवीन अॅप रिअल टाइम कॉन्व्हर्सेशनल प्लॅटफॉर्म आहे. त्यात संस्कृतीला प्राधान्य दिलं जाईल. जानेवारीमध्ये ते लाँच होणार आहे. युजर्स त्यांच्या लोकप्रिय पोस्ट्सकरता या अॅपद्वारे कमाईही करू शकतील. त्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अॅपमध्ये टी पार्टीज नावाचं एक फिचर असेल. त्याद्वारे युजर्सना ऑनलाईन किंवा वास्तविक आयुष्यात कनेक्ट केलं जाईल. यात ब्लॉकचेनचा वापर क्रिएटर्सना क्रेडीट देण्यासाठी आणि पैसे मिळवून देण्यासाठी केलेला आहे. युजर्सचं एखादं स्पिल व्हायरल झालं, तर ते मॉनेटाइज करता येईल. त्यामुळे युजर्स त्यातून पैसे कमवू शकतील. सोशल मीडियावरील या नव्या बर्ड अॅपमुळे ट्विटर वापरणाऱ्यांना एक नवा पर्याय मिळेल, मात्र ट्विटरवर त्याचा काही परिणाम होईल का ते अॅप लाँच झाल्यावरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.