आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते सक्सेस स्टोरी
मुंबई, 8 मार्च : महाराष्ट्रातील अनेक महिलांनी मेहनतीच्या जोरावर आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील मराठी मातीत जन्मात आलेल्या महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. यातच एक नाव म्हणजे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते. आज जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर जाणून घेऊयात, त्यांचा प्रेरणादायी प्रवास. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास - तेजस्वी सातपुते या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत. त्यांचा जन्म शेवगाव येथे झाला. त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या आईने त्यांना अत्यंत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. चौथीला असताना त्यांनी पायलट निर्मलजीत सिंग यांचा धडा वाचला होता. त्यांनी अत्यंत शौर्य गाजवलेल होतं आणि त्यात त्यांना वीरमरण आलं होतं. त्यामुळे आपणही पायलट व्हायचे आणि इतर जे करतात, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं, असं त्यांनी ठरवलं. दरम्यान, अकरावीला गेल्या आणि चष्मा लागला. तेव्हा सर्व जण म्हणाले की, चष्मा लागला, आता पायलट होता येणार नाही. त्यामुळे बरेच वर्षे पाहिलेले स्वप्न मोडले गेले. दरम्यान, वर्तमानपत्रात जैवतंत्रज्ञान विषयी माहिती वाचली. जैवतंत्रज्ञानाची चौथी बॅच होती. काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या बायो टेक्निकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि बीएस्सीचे शिक्षण घेतले. त्या एकत्र कुटुंबात राहत होत्या. त्यांच्या मोठ्या बहिणींची लग्न झालेली होती. कुटुंबातील त्या एकट्याच अशा होत्या की, ज्यांनी दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करू दिले होते. यानंतर त्यांनी एलएलबी चे शिक्षण करायचे ठरवले. याचदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांची युपीएससीची परीक्षा, एलएलबी सेकंड ईयरची परीक्षा एकाच वेळेस आली. अशावेळी त्यांनी यूपीएससी प्रि एक्झाम द्यायचे ठरवल. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, या उक्तीप्रमाणे त्यांनी वागायचं ठरवलं. याचदरम्यान, त्यांनी मुंबईतील एका संस्थेत, जिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यामध्ये चांगले मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जात होते, तिथे जायचे ठरवले. तिथे त्या पास झाल्या आणि महाराष्ट्रातून दहाव्या आल्या. त्यामुळे त्यांना मुंबईला मोफत माहिती आणि प्रशिक्षण मिळाले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा ही दिवाळीनंतर होती. त्यामुळे हॉस्टेलमधील मैत्रिणी घरी गेल्या होत्या. स्वयंपाक बनवणारे मेसवाले दिवाळीला सुट्टीवर गेले होते. त्यामुळे त्यादिवशी पाणी आणि पार्लेजी बिस्कीट खाल्ले होते. यूपीएससीची परीक्षा तीन प्रयत्नात दिसत असली तरी त्यासाठी अभ्यास करतानाचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. त्यावर्षी त्या प्री, मुख्य आणि मुलाखतही पास झाल्या. यूपीएससीची तयारी करताना त्यांना खूपदा वाटायचं की, घरी आई वडिलांना भेटायला जावं. पण त्या दोन ते तीन वेळेस गेल्या. मात्र, या दोन ते तीन दिवसात कोणाला उत्तर द्यावी लागू नयेत, तू काय करतेस, आता अजून किती वर्षे लागतील, मुलीचे वय वाढत चाललंय, तिचं लग्न कधी करायचं, हे टाळण्यासाठी त्या मुंबईहून सकाळी निघायच्या आणि संध्याकाळी शेगावला पोहोचायच्या. रात्रभर जे काही चांगले असेल ते बोलायच्या. पहाटेच्या वेळेस पुन्हा मुंबईला येण्यास निघायच्या. Women’s Day Special : लग्नानंतर पतीने दिली साथ, महिलेने करुन दाखवलं, ISRO मध्ये झाली शास्त्रज्ञ घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम राहिले पाहिजे - त्या म्हणतात, मी प्रत्येक दिवशी परीक्षा दिली, जीव तोडून अभ्यास केला, खूप प्रलोभने यायची, त्यावर मात केली. मी घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे मला आता यश मिळालं, म्हणून बरोबर वाटतील. पण यश मिळालं नसतं तरी सुद्धा मला ते चुकीचे वाटले नसते, कारण मला प्रत्येक क्षेत्रांने खूप काही शिकवले आहे आणि मला या क्षेत्रात काम करताना घेतलेल्या शिक्षणाचा खूप फायदा झाला आहे. अशाप्रकारे आयुष्यात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो. तर घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम राहिले पाहिजे. जिद्दीने आणि चिकाटीने काम केले तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळतेच, असे त्या म्हणतात. सध्या त्या मुंबईत डीसीपी या पदावर सेवा बजावत आहेत. त्यांचा हा प्रवास सर्वच महिला शक्तीसाठी आणि सर्वांसाठीच नक्कीच प्रेरणादायी आहे.