नवे राष्ट्रपती कोण ?,रतन टाटा, नारायण मूर्ती की द्रौपदी मुर्मू ?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी कऱण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात कधीच एवढी संदिग्धता अनुभवायला मिळाली नव्हती.

Sonali Deshpande

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBNलोकमतआपल्या संसदीय लोकशाहीत राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च मानले जाते. भलेही त्या पदाला कोणतेही थेट अधिकार नसतील, पण राज्यघटनेने त्या पदाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेले आहे. अर्थात, इंग्लंड मधील संसदीय लोकशाहीचा तो आपल्यावर पडलेला प्रभाव आहे हे सर्वजण जाणतात. त्यामुळे अध्यक्षीय लोकशाही असणाऱ्या अमेरिका किंवा फ्रान्सप्रमाणे आपल्याकडील राष्ट्रपती निवडणूक गाजत नाही. पण यंदा तसे होणार नाही असे दिसतंय .राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली  आहे. याआधी  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात कधीच एवढी संदिग्धता अनुभवायला मिळाली नव्हती. साधारपणे सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षांच्या सहमतीने दोन, तीन उमेदवार ठरवलेले असायचे. त्यातून पात्र उमेदवार जाहीर व्हायचा, सध्या  मात्र वातावरण वेगळे आहे.  'कोण होणार आपले राष्ट्रपती ?' या प्रश्नांविषयीचे कुतूहल आणि उत्सुकता गेली काही आठवड्यांपासून वाढतच राहावी याची यथायोग्य काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतल्यामुळे राजधानी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राष्ट्रपतींच्या नावाबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत.  अर्थात मोदी - शहा यांच्या नेतृत्वाने आजवर प्रत्येक मोठा राजकीय निर्णय घेताना जे धक्कातंत्र वापरले आहे, तसेच काहीसे राष्ट्रपती पदाच्या निवडीमध्ये होईल असे भाजपमधील वरिष्ठ वर्तुळात बोलले जात आहे. कारण नोटबंदी असो अथवा उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याकडे सत्तासूत्रे देण्याचा निर्णय असो, मोदी-शहा यांनी फार कोणाशी चर्चा नकरता, थेट निर्णयाची घोषणा करून विरोधी पक्षासह स्वपक्षातील दिग्गजांना आश्चर्याचे धक्के कसे दिले ते आपण पाहिलेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही हा 'सिलसिला' कायम राहणार याविषयी शंका नाही.या निवडणुकीत काँग्रेस,  यूपीए आणि अन्य विरोधी पक्ष यांची लोकसभा, राज्यसभा आणि देशभरातील विविध विधिमंडळातील ताकद सत्तारूढ भाजपप्रणीत एनडीएपेक्षा फक्त ४ टक्क्याने जास्त आहे.  भाजपसह एनडीएकडे ५,२७,३७१ [४८. १०टक्के] मते आहेत. तर सगळ्या विरोधकांकडे ५,६८,१४८ [५१. ९०  टक्के ] मते आहेत. आज यूपीएच्या अनेक घटकपक्षांची  राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे.गेल्या वेळी,  दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी  रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती. त्या बैठकीत उत्तर प्रदेशातील जानी  दुश्मन समजले जाणारे समाजवादी  पार्टी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र बसले होते. तिकडे पश्चिम बंगालात एकमेकांना पाण्यात पाहणारे तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट सुद्धा भाजपाला रोखण्यासाठी आवर्जून आले होते.  मात्र  बिहारात भाजपचा विजयाचा वारू रोखणारे  मुख्यमंत्री  नितीशकुमार  यूपीएच्या  त्या बैठकीपासून दूर राहिले होते आणि लगोलग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत एका खास बैठकीला हजर राहिले होते. त्यांचा जनता दल भाजपकडे जाण्याने विरोधकांची फार मोठी हानी होणार आहे. तीच गोष्ट दक्षिणेतील पक्षांची . चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम , वाय एस आर रेड्डींचा काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमितीचे के सी आर राव यांच्या पक्षानं एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे.  द्रमुक आणि अखिल भारतीय द्रमुक हे  तामिळनाडूतील दोन्ही मोठे पक्ष प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भाजपाकडे झुकलेले आहेत.  फक्त या सगळ्या स्थितीत शिवसेना काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी एकदा नव्हे अनेकदा सेनेने ऐनवेळी कच खाल्लेली आहे, त्यामुळे सेना या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधात जाईल , असे आजतरी वाटत नाही.उत्तर प्रदेशातील विजयाने भाजपचे राष्ट्रपती निवडणुकीतील पारडे आधीच जड झाले आहे . त्यामुळे भाजपशासित प्रदेशातील वाढती मते, मोदींचा आत्मविश्वास वाढवणारी आहेत. तिकडे  ईशान्य भारतातील मतांचा बाजार कधीही, कुठेही झुकणारा असतो, त्यामुळे प्रत्येक सत्तारूढ आघाडीला त्या 'झुलत्या मनोऱ्याचा' फायदा होतो असा इतिहास आहे, मग भाजप त्याचा नक्कीच लाभ उठवेल यात आश्चर्य कोणते ? मोदी-शहा त्यांच्या पसंतीचा असा दमदार  उमेदवार समोर आणतील की विरोधकांना त्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय उरणार नाही , असा अंदाज दिल्लीतील राजकीय वर्तुळात केला जातोय. त्यामुळे गेल्या वर्ष-दोन वर्षात जी नावे या सर्वोच्च पदासाठी चर्चेत होती, ती आता हवेत विरल्यासारखी दिसताहेत. या आधी ज्येष्ठ भाजपनेते लालकृष्ण आडवाणी , सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन ही नावे खूप पुढे होती. सध्या त्याविषयी कोणीच काही बोलत नाही. सरसंघचालक मोहनजी भागवत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. वृत्तपत्रांचे रकाने आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांनी त्यात चांगलेच तेल ओतले होते. आता तेही थंडावलेलं दिसतंय. त्यामुळे सगळीकडे उत्सुकता आहे ,पंतप्रधान मोदी कुणाचे नाव पुढे आणणार या एकाच गोष्टीची .मध्यंतरी दिल्लीतील एका वरिष्ठ भाजप नेत्याशी या विषयावर बोलताना राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित अनेक वेगळे पैलू समजले, त्यातून मोदींच्या कार्यपद्धतीवर कधी नव्हे ते आता भाजपामध्येही बोलले जाऊ लागले आहे, ते समजले. पंतप्रधान  मोदी आणि पक्षाध्यक्ष शहा हे महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी फार कुणाशी चर्चा करण्याच्या फंदात पडत नाहीत. थेट निर्णय जाहीर करून मोकळे होतात, यावर अजून कुणी आक्षेप घेतलेला नसला तरी, दबक्या आवाजात लोक बोलू लागले आहेत. पण त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. म्हणून  राष्ट्रपतीपदाकरीता अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त १४ दिवस उरले आहेत, तरी  राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही.  २८ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.  तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. मोदी-शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत जे मौन बाळगले आहे, त्यावर अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही काही भाष्य केलेले नाही. त्याच वेळी तिकडेयूपीएनं उमेदवारांच्या शोधसमितीसाठी शरद पवार यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एखादा सर्वसहमतीचा उमेदवार पुढे येतो का, हेहीपाहावे लागणार आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी एक जबरदस्त खेळी खेळून विरोधकांना चितपट करतील असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या मते , यावेळी ए पी जे कलाम यांच्या तोडीचा कर्तृत्ववान, निष्पक्ष आणि सर्वमान्य चेहरा समोर आणून मोदी नवा इतिहास घडवण्याच्या मनस्थितीत आहेत.ज्या उद्योग जगताने आजवर भारतीय अर्थव्यवस्थेला बळ दिले, पुरेसा रोजगार देऊन समाजाला उभारी दिली , त्या उद्योगजगताकडे राजकारण्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले, त्यांना त्यांच्या योगदानाचे यथायोग्य श्रेय देण्याची वेळ आली आहे, असे विद्यमान सरकारला वाटतंय. त्यामुळे जेव्हा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि सरसंघचालक यांची काही दिवसांपूर्वी नागपुरात भेट झाली होती , तेव्हा हा विषय गाजला होता. टाटा उद्योगसमूह आणि रतन टाटा यांचे उद्योगजगतातील योगदान सारेजण जाणतात आणि मानतात . अगदी दुसरी तशीच एक व्यक्ती आहे, त्यांचे नाव आहे नारायण मूर्ती, इन्फोसिसचे संस्थापक - अध्यक्ष ही त्यांची ओळख असली तरी, ते भारताला माहिती-तंत्रज्ञानात पुढे नेणाऱ्या मोजक्या लोकांपैकी आहेत. जेव्हा भारतीय संगणक तज्ज्ञ इंग्लंड -अमेरिकेच्या दिशेने पळत होते, त्यावेळी नारायण मूर्ती यांची पावले मायभूमीच्या दिशेने वळत होती. वैफल्य आणणाऱ्या  भारतीय लालफितीचा जाच सहन करीत, असंख्य संकटाना तोंड देत इन्फोसिसने भारतात पाय रोवले आणि जगात पंख पसरवले. त्याच्या बळावर भारतीय आयटी उद्योग वाढला, फोफावला. आज अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बदललेल्या धोरणांमुळे , बदलत्या जागतिक परिस्थितीने आयटी उद्योग धोक्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती किंवा त्यांच्या समाजाभिमुख पत्नी , लेखिका सुधा मूर्ती यांच्यासाठी राष्ट्रपतीपदाचे दरवाजे उघडले तर परिस्थिती बदलेल, असा अनेकांना विश्वास वाटतोय.   त्यामुळे रतन टाटा किंवा नारायण मूर्ती यांच्यासारखा माणूस राष्ट्रपती पदावर बसला तर त्या पदाचा सन्मान वाढेल आणि उद्योग जगतालाही न्याय मिळेल असे  भाजपगोटात बोलले जात आहे .याशिवाय देशातील बदलते राजकारण पाहता , राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या आघाडीवर असलेलं आणखी एक  नाव आहे, द्रौपदी मुर्मू  . झारखंडच्या राज्यपाल असणाऱ्या  द्रौपदी मुर्मू यांचं भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खूप चर्चिले जात आहे. त्या आदिवासी आहेत. आजवर दलित-आदिवासींचे कार्ड वापरणाऱ्या काँग्रेसने या पदासाठी कधीच आदिवासी उमेदवाराचा विचार केलेला नाही. त्यामुळे भाजपकडून जर मुर्मू यांच्या  नावावर शिक्कामोर्तब झालं तर देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती आम्ही दिल्याचा दावा  भाजपला करता  येईल.गेल्या तीन वर्षात भाजपने बऱ्यापैकी दलित, ओबीसींना आपल्याकडे वळविलेले  दिसते. त्यात मुस्लिमांसह , आदिवासी हा असा वर्ग आहे, जो अजूनही काँग्रेसकडे बऱ्यापैकी टिकून आहे. ओडिशातील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, तेथील आदिवासी स्त्रीला उमेदवारी देऊन ओदिशी अस्मितेला हाक देत भाजपला विजयासाठी प्रयत्न करणे सोपे जाईल असे वाटतेय. बघू या , दिल्ली अब दूर नही... राष्ट्रपती भवनात कोण जाणार हे येत्या दहा-बारा दिवसात स्पष्ट होईल.

Trending Now