Solar Pump Yojana: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज
मुंबई, 19 सप्टेंबर: केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी एकापाठोपाठ एक योजना राबवत आहेत. एकीकडे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील जमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत लहान-मोठ्या शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून दिले जात आहेत. वीज नसल्यामुळं सिंचनाअभावी पिकांच होणार नुकसान टाळण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा उत्पन्न वाढवता येण्यासाठी सौरपंप अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौरपंप बसवण्यात येत आहेत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप लावण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते, म्हणजेच त्याच्या एकूण खर्चापैकी 30 ते 40 टक्के रक्कम त्यांना स्वतः भरावी लागते. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधनही बनलं आहे. देशात आजही अनेक शेतकरी आजही डिझेल इंजिननं सिंचन करतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च होतो. प्रधानमंत्री कुसुम योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे सिंचनाबाबत जागरुक करणं हा आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासोबतच इंधनाचीही बचत करता येईल. ही योजना लागू होऊन जवळपास 3 वर्षे होत आहेत, मात्र आजही या योजनेपासून वंचित राहणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीत, आपण शेतात सौर पंपासाठी अर्ज कसा करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सौर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा? प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत तुमच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी प्रथम mnre.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. मुख्यपृष्ठावर जा आणि मार्गदर्शक तत्त्वं आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. सौर पंपासाठी नोंदणी करण्याचा पर्याय उजव्या बाजूला दिला आहे, येथे स्वतःची नोंदणी करा. यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. नोंदणी स्वीकारल्यानंतर अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाइल क्रमांकावर टोकन क्रमांक तयार केला जाईल आणि पंपासाठी 60 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त 30 टक्के रक्कम जमा करावी लागेल. काही दिवसात तुमच्या शेतात सौरपंप बसवला जाईल. अधिक तपशीलांसाठी एकदा अधिकृत वेबसाइटला भेट द्या, येथे जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं काळजीपूर्वक वाचा. हेही वाचा: Oyo घरबसल्या देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी! जाणून घ्या कधी आणि कसं? अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणं आवश्यक आहे. शेतकरी जमिनीच्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो. येथे अर्ज करण्यासाठी, आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची छायाप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, रेशन कार्ड, नोंदणीची प्रत, चार्टर्ड अकाउंटंटने दिलेले वार्षिक उत्पन्न, अधिकृतता पत्र, सातबारा (शेतीची कागदपत्रे) इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. कृपया लक्षात घ्या की त्याची छायाप्रत स्कॅन करून अर्जासोबत जोडावी लागेल. सौर पंपासाठी 30 टक्के कर्ज तुम्हाला बँकाही देतील. बनावट वेबसाइट्सपासून सावध रहा: अलीकडेच ऊर्जा मंत्रालयानं एक अधिसूचना जारी करून प्रत्येकानं प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावानं फसव्या वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक बनावट वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स पंतप्रधान कुसुम योजनेच्या नावाखाली अर्जदारांना पंपाची फी आणि खर्च भरण्यास सांगत असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे. अशा परिस्थितीत लोकांना अशा साइट्सपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.