आता गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर; ब्रिटिश कंपनीनं केलं संशोधन
नवी दिल्ली, 10 जानेवारी : आजकाल शेतीची मशागत करताना पारंपरिक पद्धतीचा फारसा अवलंब होत नाही. बैलगाडी आणि लाकडी नांगराच्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ही यांत्रिक मशागत शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरते. ही बाब लक्षात घेऊन न्यू हॉलंड या कंपनीनं द्रवरूप मिथेनवर चालणारा नवीन ट्रॅक्टर लाँच करण्याचा विचार केला आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे महागड्या डिझेलवर खर्च होणारे पैसे वाचणार आहेत.
शिवाय, शेतीची कामं करताना ट्रॅक्टरमधून होणारं कार्बन उत्सर्जनही थांबवता येणार आहे. विशेष म्हणजे, गाईच्या शेणापासून ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेला मिथेन सहजपणे तयार करता येऊ शकतो. त्यामुळे उद्योगांसाठी एक चांगलं सर्क्युलर आर्थिक मॉडेल उपलब्ध होईल. ‘गूड न्यूज नेटवर्क’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : नादच करायचा नाय! पठ्ठ्याने पाळलाय तब्बल 20 कोटींचा Dog; खासियत काय तुम्हीच पाहा
बेन्नमन या ब्रिटीश कंपनीनं ट्रॅक्टरमधील टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. ही कंपनी एक दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनांवर संशोधन आणि विविध उत्पादनांचा विकास करत आहे. द्रवरूप मिथेनवर चालणारा हा 270 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर नियमित डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीनं काम करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचं इंधन मिळवण्यासाठी, फार्मबेस्ड बायोमिथेन स्टोरेज युनिटमध्ये साधारण 100 गायींच्या कळपातील टाकाऊ पदार्थांचं फ्युजिटिव्ह मिथेन नावाच्या इंधनात रुपांतर करता येऊ शकतं.
ट्रॅक्टरवर बसवलेली क्रायोजेनिक टाकी मिथेनला -162 डिग्री सेल्सिअस तापमानात द्रव स्वरूपात ठेवते. त्यामुळे वाहनाला डिझेलइतकी शक्ती मिळते आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होते. कॉर्नवॉलमधील एका शेतात घेण्यात आलेल्या पायलट टेस्टिंगदरम्यान हा ट्रॅक्टर नियमित ट्रॅक्टरच्या गतीनं चालत असल्याचं सिद्ध झालं. या ट्रॅक्टरचा वापर करून एका वर्षात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 2,500 मेट्रिक टनांवरून 500 मेट्रिक टनांपर्यंत कमी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
बेन्नमनचे सह-संस्थापक ख्रिस मन म्हणाले, “T7 लिक्विड मिथेन-इंधनयुक्त ट्रॅक्टर हा मिथेनवर चालणारा जगातील पहिलाच ट्रॅक्टर आहे. जागतिक कृषी उद्योगाला डिकार्बनाइज करण्यासाठी आणि सर्क्युलर अर्थव्यवस्था साकार करण्याच्या दिशेनं हे आणखी एक पाऊल आहे.”
कंपनी या तंत्रज्ञानाच्या व्यापक वापराच्या शक्यता तपासत आहे. ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, अशी कंपनीला आशा आहे. द कॉर्नवॉल ग्रुप आणि आयल्स ऑफ सिसिली लोकल एंटरप्राइझ पार्टनरशिप (एलईपी) कॉर्नवॉलमधील फ्युजिटिव्ह मिथेन उत्सर्जनाच्या स्केलचं मूल्यांकन करण्यासाठी निधी देत आहेत. या पार्टनरशीपअंतर्गत वाहतूक आणि शेतीसाठी इंधन म्हणून बायोमिथेनच्या भविष्यातील संभाव्य वापराचा अभ्यास केला जाईल. या अभ्यासाचं लोकेशन बेन्नमनचं मुख्यालय असेल. डेअरी फार्म आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांसारख्या साइट्समधून सध्याच्या उत्सर्जनाची तपासणी करतील.
हे ही वाचा : कार रेसिंगदरम्यान भयानक दुर्घटना; प्रसिद्ध रेसरचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद, VIDEO
एलईपीचे अध्यक्ष मार्क डड्रिज म्हणाले, “उर्जा उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि उर्जा विक्रीच्या सतत बदलणाऱ्या किमती यांचा विचार करता, आपण आपलं शेती क्षेत्र किंवा उद्योग उर्जेबाबत स्वावलंबी करू शकलो तर फार बरं होईल. शिवाय, यामुळे विषारी वायूंचं उत्सर्जनही कमी होईल. असं झाल्यास आपण ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना आणि अन्न सुरक्षा देण्यास सक्षम होऊ. या सर्वांचा एकत्रित परिमाण म्हणून हवामान बदलाच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं आपण नेट झिरोकडे वाटचाल करू शकतो.” “ही बाब केवळ शेती किंवा कॉर्नवॉलपुरती मर्यादित नाही तर ती जागतिक स्तरासाठी उपयुक्त आहे,” असंही डड्रिज म्हणाले.