मुंबई, 27 मे : यंदा नेहमीपेक्षा मान्सून (MONSOON) लवकर येणार असे हवामान खात्याकडून (imd alert monsoon) सांगण्यात येत होते परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती. मान्सून (Monsoon Update) अरबी समुद्रात तब्बल सहा दिवसांपुर्वी दाखल झाल्यानंतर श्रीलकेजवळ थांबला होता. दरम्यान मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मागच्या वर्षीपेक्षा मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये लवकर झाले परंतु काही काळानंतर याचा वेग मंदावला. १६ मे रोजी अंदमानात आगमन झालेल्या मॉन्सूनने वाटचाल करत ता. १८ मे रोजी अंदमान- निकोबार बेटावर आला. तर २० मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही मॉन्सूनने वाटचाल सुरू केली. मात्र त्यानंतर मॉन्सून वाऱ्यांची पुढील प्रगती मंदावली होती. गुरुवारी 26 मान्सूनने पुन्हा वाटचाल केली असून, श्रीलंका देशाच्या निम्म्या भाग मॉन्सूनने व्यापला आहे.
केरळातील आगमनाचा मुहूर्त टळणार
यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसांची विलंब होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मॉन्सूनचे केरळातील आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून पुढच्या चार दिवसात येतो परंतु मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
तसेच नैर्ऋत्य व अग्नेय अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, भारताच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडील कोमोरिन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, संपुर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
राज्यात मागचा काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये पिकांसह साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात अचानक हवामानात बदल झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.