JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / पावसामुळे पिकांची नासाडी? काळजी करू नये, ताबडतोब विम्याचा क्लेम करा, ही आहे पद्धत

पावसामुळे पिकांची नासाडी? काळजी करू नये, ताबडतोब विम्याचा क्लेम करा, ही आहे पद्धत

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी विम्याची रक्कम वेगळी आहे.

जाहिरात

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी विम्याची रक्कम वेगळी आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्थाही बर्‍याच अंशी शेतीवर अवलंबून आहे. पण असं असूनही बळीराजाच्या अडचणी नेहमीच वाढताना दिसतात. शेतकरी आत्महत्या हा कळीचा मुद्दा आहे. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, हमी भावातील घट या समस्यांमुळे शेतकरी ग्रासलेला असतो. आता शेतकर्‍यांनी चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्यांना सहज मिळणार आहे. जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल अधिक माहिती. गेल्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरसोबत उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना पावसाने झोडपलं आहे. परिणामी, या राज्यातल्या शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. पण शेतकर्‍यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ते केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ या योजनेचा फायदा घेऊ शकतात. यामुळे शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढू शकतो. ज्यासाठी असणारा प्रीमीअम हा अत्यल्प आहे. शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून त्याची भरपाई दिली जाईल. विमा कसा कराल? पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. यामुळे पिकाचा विमा काढणं अगदी सोपं आहे. किसान क्रेडिट कार्डधारक आपल्या पिकाचा विमा काढू शकतात. तुम्ही जर एखाद्या बँकेकडून कृषी कर्ज घेतलं असेल, तर त्याच बँकेतून तुम्ही पिकाचा विमाही काढू शकाल. यासाठी तुम्हाला बँका आणि विमा ऑफिसमध्ये खेटे घालायची गरज नाही. बँकेकडून तुम्हाला एक अर्ज दिला जाईल. तो भरून देणं आवश्यक आहे. कर्ज घेताना बॅकेला जमिनीशी संबंधित कागदपत्रं द्यावी लागतात. यासाठी त्याच बँकेकडून विमा घेणं हे अधिक सोपं होतं. तसंच ज्या शेतकर्‍यांनी कर्ज घेतलं नाहीये, अशांनाही कुठल्याही बॅंकेतून पिकाचा विमा काढता येतो. कृषी बँकेत विमा उतरवताना आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रं, ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या पत्राप्रमाणे तुमच्या एकूण पिकाची माहिती, मतदान कार्ड (Voter ID) याची गरज लागते. वाचा - शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे विम्यासाठी क्लेम कसा कराल? पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विम्यासाठी दोन प्रकारे क्लेम करता येतो. अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला विमा मिळू शकतो. तसंच काही कारणाने पिकाचं खूप नुकसान झालं असेल किंवा सरासरीपेक्षा उत्पन्न घटलं असेल तर तुम्ही विम्यासाठी क्लेम करू शकता. सरासरीपेक्षा उत्पन्नात घट झाल्यास, विमा कंपन्या आपणहूनच बळीराजाच्या खात्यात पैसे भरतात. यासाठी बळीराजाला अर्ज करायची आवश्यकता नसते. परंतु, जर नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, पिकावर रोग पडणं यामुळे पीक खराब झालं. पिकाची संपूर्ण नासाडी झाली अशा वेळेस शेतकर्‍याने अर्ज करणं गरजेचं आहे. तसंच 72 तासांच्या आत याबद्दलची माहिती कृषी विभागाकडे सुपूर्द करावी लागते. यासाठी एक फॉर्म व्यवस्थित भरणं आवश्यक असतं. या फॉर्ममध्ये कोणतं पीक घेतलं होतं? कशाने पीक खराब झालं? किती हेक्टरमध्ये किंवा प्रमाणात पीक घेतलं होतं? ही माहिती भरणं आवश्यक असतं. यासोबत गावाचं नाव आणि शेतीविषयक इतर माहिती देणं गरजेचं असतं, यासोबतच पिकाच्या विमा पॉलिसीच्या पेपरची छायाप्रत (फोटोकॉपी) जोडावी लागते. क्लेमची रक्कम किती असते? पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी असते. सगळ्यात जास्त भरपाई ही कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मिळते. प्रतिएकराला ही रक्कम 36,282 रुपये इतकी आहे. धान्य उत्पादक शेतकर्‍यांना 37,484 रूपये विमा मिळतो. तसंच बाजरीच्या पिकासाठी 17,639 रुपये, मक्यासाठी 18,742 रुपये तर भुईमुगाच्या पिकासाठी 16,497 रुपये प्रतिएकर मिळतात. बळीराजाच्या हिताच्या या योजनांमुळे त्यांच्या समस्या बर्‍याच अंशी कमी होतील. शेतकरी आत्महत्यांनाही आळा बसू शकेल हे निश्चित.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या