यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती; पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली, 14 जून : घाऊक बाजारात इतर धान्यांच्या तुलनेत चांगली किंमत मिळत असल्यामुळे सोयाबीन पीक (soybean farm) शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात राज्यातल्या शेतकऱ्यांची इतर कडधान्यं किंवा भरडधान्यांपेक्षा सोयाबीनला पसंती राहणार आहे. या वर्षी राज्यात सुमारे 46 लाख हेक्टर जमिनीवर सोयाबीनचं उत्पादन (Soybean production) घेतलं जाण्याचा अंदाज आहे. यासाठी राज्यभरात सुमारे 1.4 लाख टन बियाण्याची गरज भासणार आहे. यातलं 1.2 लाख टन बियाणे (Soybean Seeds) हे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार असून, उर्वरित बियाणं राज्य आणि केंद्र सरकारच्या बियाणे महामंडळाने (Seed Corporation) उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या वर्षी साधारणपणे 30 ते 40 टक्के शेतकरी त्यांचं स्वतःचं बियाणं (Reuse Own Seeds) वापरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं वापरावं याबाबत प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमा राज्याच्या कृषी विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये राबवल्या आहेत. यामध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आपल्या पिकातून बियाणं कसं मिळवावं याची प्रात्यक्षिकंही त्यांनी दाखवली आहेत; मात्र कोणतंही बियाणं वापरण्यापूर्वी त्यांची उगवण चाचणी (Germination Test) घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. चाचणीसाठी घेतलेल्या बियाण्यापैकी किमान 70 टक्के बियाणं अंकुरित झालं पाहिजे, तरच ते पेरणीसाठी पात्र ठरतं. कृषी विभागाकडून गावपातळीवर अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात.
हे ही वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची बाजी, देशात पहिल्या तर जगात दुसऱ्या क्रमांकावर
सध्या बहुतांश शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) बियाण्याची वाट पाहावी लागणार नाही असं चित्र दिसत आहे. एकूण 46 लाख हेक्टरवर लागवडीसाठी 1.4 लाख टन बियाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे 4.6 लाख टन सोयाबीन उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. या बियाण्यापैकी 3.5 लाख टन बियाण्यावर उगवण चाचणी पूर्ण झाली असून, त्यांपैकी 2.8 लाख टन बियाणं पेरणीसाठी पात्र ठरलं आहे. शेती विभागाच्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचे आयुक्त दिलीप झेंडे यांनी शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पुरेसं बियाणं असल्याची खात्री केली. “जिल्हानिहाय माहितीनुसार शेतकऱ्यांना आणखी बियाण्याची गरज भासणार नाही; मात्र एखाद्या जिल्ह्यात मागणी-पुरवठा साखळीमध्ये अनियमितता येऊ शकते,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ग्रीन गोल्ड या खासगी बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनीचे एमडी अजित मुळे यांनीदेखील या गोष्टीला दुजोरा दिला. ते म्हणाले, की बहुतांश शेतकरी त्यांचं स्वतःचं बियाणं वापरत आहेत. सध्या सोयाबीनचा दर 7000 रुपये प्रति टन सुरू आहे. एखाद्या कंपनीने त्यांच्या अपेक्षेपेक्षा आणि खर्चापेक्षा अधिक उत्पादन देण्याचा दावा केला, तर शेतकरी बियाणं विकतही घेऊ शकतात. खासगी कंपन्यांकडे बियाणं साठवून ठेवण्यासाठी विशेष सोय असते, जी शेतकऱ्यांकडे नसते. त्यामुळे शेतकरी या बियाण्याचा पर्याय वापरण्याची शक्यताही आहे. सोयाबीनव्यतिरिक्त मका आणि कापसाच्या बियाण्यालाही मोठी मागणी असल्याचं अजित मुळे यांनी सांगितलं.
हे ही वाचा : मान्सून मुंबई, पुण्यात नाही पण आहे तरी कुठे? राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा alert
एकंदरीत, बियाण्याची उपलब्धता या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही; मात्र, शेतकरी सध्या मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे. आधी पाच जूनला येणं अपेक्षित असलेला मान्सून गोव्यात रेंगाळल्यामुळे त्याचं आगमन उशिरा झालं. सध्या मान्सून महाराष्ट्रात आला असला, तरी कित्येक भागांमधले शेतकरी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करत आहेत.