मुंबई, 05 जून : मागच्या महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला होता दरम्यान 25 मे पासून काही दिवस मान्सून पूर्व (pre monsoon rain)पावसाने दिलासा दिल्याने राज्यातील काही भागात उष्णता कमी झाली होती. परंतु मान्सून पूर्व पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली आहे.(weather update) उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघाल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. (heat wave) मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही 45 अंशापर्यंत उष्ण लाट होती. आज (ता.05) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागच्या 24 तासांमध्ये नागपूर, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान 45 अंशावर तर गोंदिया वर्धा येथे तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर होता.नगर येथे पारा 41 अंशांपार असून, कमाल तापमानात 5अंशांपेक्षा वाढ झाल्याने उष्ण लाट होती. विदर्भात कमाल तापमान 39 ते 46 अंश, मराठवाड्यात 40 ते 41 अंश, मध्य महाराष्ट्रात 28 ते 40 अंश तर कोकणात 32 ते 34 अंशांच्या आसपास होते.
हे ही वाचा : मर्सिडीजने जगभरातून त्यांच्या जवळपास 10 लाख गाड्या परत मागवल्या, काय आहे कारण?
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यापासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बिहार ते आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. आज (ता. 5) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात मागच्या 24 तापमान
मागच्या 24 तासांत राज्यात पुणे 36.9, नगर 41.4, धुळे 45.9, जळगाव 41.7, कोल्हापूर 32.6, महाबळेश्वर 29.4, मालेगाव 42.2, नाशिक 36.1, निफाड 37.2, सांगली 33.9, सातारा 37.5, सोलापूर 38.5, सांताक्रूझ 34.1, डहाणू 34.2, रत्नागिरी 33.7, औरंगाबाद 41.1, नांदेड 41, अकोला 43.5, अमरावती 44.4, बुलडाणा 39.2, ब्रह्मपुरी 46.1, चंद्रपूर 46.4, गोंदिया 45.4, नागपूर 46.2, वाशीम 41.5, वर्धा 45.2, यवतमाळ 43.2 तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : भारतात पुन्हा वाढला Corona चा आलेख; गेल्या 10 दिवसांत अशी वाढली संख्या, ‘या’ 5 राज्यांना सर्वाधिक धोका
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे.