सांगली, 01 नोव्हेंबर : एका मागून एक संकटांना तोड देऊन फुलवलेली द्राक्ष बाग रात्रीत वटवाघळांनी फस्त केली आहे. मिरज तालुक्यातल्या लिंगनूर या गावत ही घटना घडली आहे. दोघा भावंडांनी नजर लागेल अशी द्राक्ष बाग फुलवली होती. या द्राक्षांची बोलीही लागली होती. मात्र तोडणी आधीच वटवाघळांनी द्राक्ष बागेवर हल्ला करून दोघा तरुण भावंडांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील लिंगनूर या गावातील अवधूत आणि शिवदूत श्रीकांत माळी हे दोघे भावंड शेती करतात. वडिलोपार्जित 2 एकर शेती असून गेल्या पाचसहा वर्षांपासून भावंड शेतीत मेहनत करीत आहेत. बावीस वर्षीय अवधूतचे शिक्षण बीए पूर्ण झाले आहे. तर वीस वर्षीय शिवदूत हा बीए दुसऱ्या वर्षात शिकत आहे. दोन वर्षांपूर्वी अवधूत व शिवदूतच्या वडिलांना कॅन्सर सारखा आजार झाला. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी दोघा भावंडांवर आली. वडिलांचा उपचाराचा मोठा प्रश्न होता. आर्थिक परिस्थिती नसल्याने दोघा भावंडांनी वडिलांच्या उपचारासाठी कर्ज काढले. कर्ज फेडायचं म्हणून पावसाळ्यात द्राक्ष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक छताचे पांघरून घालून पावसापासून द्राक्ष बागेचे संरक्षण केलं. नजर लागेल अशी द्राक्ष बाग फुलवली.
दिवाळीत भावही ठरला
ऑक्टोबर महिन्यामध्ये माळी भावांची उत्तम प्रकारे द्राक्षे बाग फुलली. द्राक्ष बागेला पाहण्यासाठी आसपासचे व्यापारी मोठ्या संख्येने येऊ लागले होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी व्यापाऱ्याने माळी बंधूंची द्राक्ष बाग पसंत केली. चार किलो पेटीसाठी पाचशे तीस रुपये दर फायनल केला. दोघा भावांनी त्याला प्राथमिक होकार दिला. 27 ऑक्टोबर रोजी बाग तोडणीचे निश्चित देखील झाले.
सण उत्सवात प्लास्टिक फुलांचाच बोलबाला, शेतकरी संकटात, पाहा Video
रात्रीत वटवाघळांनी बागेचा फडशा पाडला
26 ऑक्टोबरला दोघे भावंड द्राक्ष बागेत पोहचले असता संपूर्ण बागच अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. एका रात्रीत वटवाघळांनी बागेचा फडशा पाडला. प्रचंड मेहनत करून पिकवलेली आणि हाता तोंडाशी आलेली बाग एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. अवघ्या एका दिवसाने बागेची तोडणी होणार होती, मात्र, त्यापूर्वीच माळी भावंडांच्या द्राक्ष बागेवरच नव्हे तर त्यांच्याही आयुष्यावर नियतीचा हा क्रूर घाला पडला आहे.
माळी भावंडांनी द्राक्ष बागेसाठी चार ते साडेचार लाख इतका खर्च केला आहे. त्यासाठी हात उसने आणि सोसायटीचे कर्ज घेतले आहे. वडिलांच्या उपचारासाठी घेतलेलं कर्ज आणि द्राक्ष बागेसाठी काढलेले कर्ज असा कर्जाचा डोंगर दोघा भावांचा डोक्यावर राहिला आहे. अगदी हताश होऊन आता दोघे भावंड या संकटातून सावरण्यासाठी सरकारकडे मदतीचा हात मागत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.