सातारा, 29 ऑक्टोबर : जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी प्लास्टिक कृत्रिम फुलांमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेले काही वर्ष चीन आणि देशी बनावटीच्या प्लास्टिक फुलांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत. मार्केटमध्ये देखील या प्लास्टिक फुलांचा बोलबाला आहे. याचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांत चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण व समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू,अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादींच्या सुट्या फुलांना व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र, ही सर्व फुले चीनमधून प्लॅस्टिक स्वरूपात कृत्रिम फुले म्हणून मोठ्या प्रमाणात आयात झालेली आहेत. या फुलांचा वापर विविध समारंभात केला जात आहे. याचा सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
प्लॅस्टिक फुलांच्या आयातीवर बंदी घालावी
वास्तविक पाहता फूल शेती करण्यासाठी फूल उत्पादक शेतकऱ्यांना शेडनेट उभे करण्यासाठी एकरी 10 ते 15 लाख तर ग्रीन हाऊससाठी एकरी 70 ते 75 लाख रुपये खर्च येतो. सरकारकडून मिळणारे अनुदानही तुटपुंजे आहे. गेल्या दोन वर्षातील अस्मानी व सुलतानी संकटामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने सरकारने चिनी बनावटीच्या कृत्रिम प्लॅस्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर बंदी घालावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
'या' गावानं महिला सक्षमीकरणात कमावलं नाव!, महिलांसाठी राबविले अनोखे उपक्रम, पाहा Video
दिवसेंदिवस आर्थिक घट
फूल शेतीचा व्यवसाय आजोबा, वडलानंतर आता मी गेली सहा वर्ष झाले करत आहे. मागील उत्पादन बघता दिवसेंदिवस माझी या क्षेत्रातील आर्थिक घट होत आहे. प्लास्टिक फुलांमुळे बाजारपेठांमध्ये फुलाची मागणी कमी झाली आहे. लग्न समारंभ, नामकरण सोहळा, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये चिनी प्लास्टिकची फुले वापरली जात आहेत. लग्नकार्यात तर संपूर्ण सजावटीच्या साहित्यामध्ये चिनी प्लॅस्टिक फुलांचा समावेश आहे. नवरानवरीचे हार फक्त फुलांचे राहिले असल्याचे शेतकरी अभिजित बोराटे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Satara, Satara news, शेतकरी, सातारा