मुंबई, 02 जानेवारी : सर्वांनी नुकतंच नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं आणि 2022 या सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. 31 डिसेंबरला देशात सर्वत्र न्यू ईयर पार्टीचा माहोल होता. या दिवशी बाहेर पार्टी करण्याऐवजी अनेकांनी घरातच पार्टी करून सेलिब्रेशन केलं. या दिवशी हॉटेल, रेस्टॉरंटमधून अन्नपदार्थ मागवले गेले. ग्राहकांची ही मागणी पूर्ण करण्यात झोमॅटो डिलिव्हरी अॅप आघाडीवर होतं. फूड डिलिव्हरी वेळेत करण्यासाठी झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण होता; मात्र ऑर्डर्सची संख्या पाहून कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपेंदर गोयल स्वतः मैदान उतरले आणि त्यांनी फूड डिलिव्हरी एजंटची भूमिका बजावली. एकीकडे हे काम सुरू असताना गोयल सातत्याने ट्वीटदेखील करत होते आणि त्यांच्या ट्विटवर नेटिझन्सच्या कमेंट्सचा पाऊस पडत होता. तुम्ही स्वतः रोज किमान एकदा हे काम केलं, तर तुम्हाला डिलिव्हरी प्रक्रियेत नक्कीच सुधारणा करता येतील. तसंच डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हच्या समस्या देखील समजतील, अशा स्वरूपाच्या सूचनावजा कमेंट्स युझर्सनी केल्या आहेत.
Going to deliver a couple of orders on my own right now. Should be back in an hour or so.
— Deepinder Goyal (@deepigoyal) December 31, 2022
ट्वीटमध्ये गोयल यांनी लिहिलं की, `काय दिवस होता! खरं तर ही रात्रीची वेळ होती. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2022मधल्या चांगल्या अनुभवांसाठी आमचे ग्राहक, रेस्टॉरंट पार्टनर, डिलिव्हरी पार्टनर आणि टीमचे खूप खूप आभार.` यावेळी गोयल यांनी त्यांचा ट्विटर बायोही बदलला आणि झोमॅटो, ब्लिंकीटवर `डिलिव्हरी बॉय` असा उल्लेख केला. हेही वाचा : सासुसाठी सून अशी नाचली अशी नाचली की…Video पाहून तुमचीही बोलती बंद होईल! गोयल यांनी 31 डिसेंबरला ट्वीट करून आपण स्वतः काही ऑर्डर्स द्यायला जात असल्याची माहिती दिली. `सध्या मी स्वतः काही ऑर्डर देणार आहे. साधारण तासाभरात परत यायला हवं,` असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं. जेव्हा ते त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात त्यांची पहिली ऑर्डर देण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी डिलिव्हरी एजंट वापरत असलेलं लाल जाकीट घालून स्वतःचा फोटो शेअर केला. त्या वेळी त्यांनी ट्वीट केलं, की `माझी पहिली डिलिव्हरी मला झोमॅटोच्या कार्यालयात परत घेऊन आली, खूप छान!`
यानंतर गोयल यांनी चार ऑर्डर डिलिव्हर कशा केल्या याविषयीचा अनुभव शेअर केला. या ऑर्डर्सपैकी एक ऑर्डर वयोवृद्ध दाम्पत्याची होती. हे दाम्पत्य आपल्या नातवंडांसोबत नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी करत होतं. हा अनुभवदेखील गोयल यांनी शेअर केला. हेही वाचा : अभिनेत्री ज्यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत बांधली लग्न गाठ, पाहा Photo `आज वितरित केलेल्या ऑर्डर्सची संख्या… आमच्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसच्या पहिल्या तीन वर्षांमध्ये दिलेल्या सर्व ऑर्डर्सच्या बेरजेएवढी आहे,` असं ट्वीट गोयल यांनी केलं.
यावर एका युझरने कमेंट केली, `हे चांगलं आहे. तुम्ही 2023मध्ये तुमचं प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक कामाच्या दिवशी किमान एक ऑर्डर वितरित केल्यास खूप चांगलं होईल. झोमॅटोच्या बिझनेस मॉडेलमध्ये डिलिव्हरीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही असं केल्यास कार्यक्षमता सुधारण्यासाठी अधिक चांगल्या कल्पना मिळतील.` दुसऱ्या एका युझरने याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. `तुम्ही एक आठवडा सातत्याने फिल्डवर काम केलं तर तुम्हाला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हच्या समस्या समजू शकतील. दोन ऑर्डर डिलिव्हर करण्याला काहीच अर्थ नाही,` असं हा युझर म्हणतो. तिसऱ्या एका युझरने कमेंट करताना, `दीपेंदर यांना सलाम. अशा उत्कटतेने आणि समर्पणाने तुम्ही निश्चितपणे झोमॅटोला पुढच्या स्तरावर घेऊन जाल,` असं म्हटलं आहे.