बागपत, 11 जानेवारी : उत्तर प्रदेशच्या बागपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्याविरोधात साप मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गंत या तरुणावर छपरौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मृत सापाचे पोस्टमार्टम केल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तरुण फरार झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नेमकं काय घडलं? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बागपतच्या छपरौलीमध्ये एका बारा फूट सापाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. छपरौलीमधील शबगा गावात रामशरण नावाच्या तरुणाच्या घरात एक बारा फूट लांबीचा साप घुसला होता. या सापाला त्याच गावातील तरुण सुवालीन याने मारलं आणि त्यानंतर या सापाला लाकडी दांडक्यावर घेऊन तो गावभर फिरला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल वनविभागाकडून घेण्यात आली आणि संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा : या 9 देशात उघडपणे प्रेम करणे म्हणजे तुरुंगवास; चुंबन घेणे लांब हात जरी.. पाहा फोटो पोस्टमार्टमनंतर हत्येचा गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साप मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाकडून या व्हिडीओची दखल घेण्यात आली. सापाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टममध्ये या सापाला काठी आणि लोखंडी रॉडने मारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.