मराठी बातम्या /बातम्या /Viral /जगातील सर्वात खतरनाक झाड! स्पर्श करताच जीव नकोसा होईल; चुकूनही हात लावू नका

जगातील सर्वात खतरनाक झाड! स्पर्श करताच जीव नकोसा होईल; चुकूनही हात लावू नका

फोटो सौजन्य - Imgur.com

फोटो सौजन्य - Imgur.com

अगदी सर्वसाधारण झाडांसारखंच असलेलं हे झाड जगातलं सर्वांत त्रासदायक आणि भयानक झाड म्हणून ओळखलं जातं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  कॅनबेरा, 20 जानेवारी : आपली पृथ्वी अत्यंत वैविध्यपूर्ण अशा आश्चर्यांनी भरलेली आहे. त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत, की ज्यांच्याबद्दल माणसाला माहितीही नाही. काही गोष्टी अशा आहेत, की ज्याबद्दल वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून आणि अभ्यासातून काही गोष्टी कळल्या आहेत. यापैकीच एक गोष्ट म्हणजे जगातलं सर्वांत भयानक असलेलं झाड. त्या झाडाचं नाव आहे जिमपाय जिमपाय (Gympie Gympie). या झाडाचं शास्त्रीय नाव डेंड्रोक्नाइड मोरॉइड्स (Dendrocnide moroides) असं आहे. ऑस्ट्रेलियातल्या पर्जन्यवनांमध्ये आढळणारं आणि दिसायला अगदी सर्वसाधारण झाडांसारखंच असलेलं हे झाड जगातलं सर्वांत त्रासदायक आणि भयानक झाड म्हणून ओळखलं जातं. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ या.

  ऑस्ट्रेलियातल्या ईशान्येकडच्या जंगलात हे झाड आढळतं. त्याला सुसाइड प्लांट, जिम्पाय स्टिंगर, स्टिंगिंग ब्रश किंवा मूनलायटर अशी इतरही अनेक नावं आहेत. मोलक्कस आणि इंडोनेशियातही हे झाड आढळतं. या झाडाची पानं हृदयाच्या आकाराची असतात आणि त्याची उंची 3 ते 15 फुटांपर्यंत असू शकते.

  या झाडावर बारीक काटे असतात आणि त्यात न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं. काट्यांच्या माध्यमातून हे विष झाडाच्या संपर्कात येणाऱ्यांच्या शरीरात प्रवेश करतं. नावाप्रमाणेच हे विष थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतं. त्यामुळेच या विषबाधेमुळे मृत्यूही होऊ शकतो. काटे लागल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने वेदनांची तीव्रता वाढू लागते आणि काही उपचार वेळेत न मिळाल्यास ही तीव्रता वाढतच जाते.

  हे वाचा - मुंबईतील फ्लॅटपेक्षाही कमी किमतीत मिळतोय चक्क एक संपूर्ण आयलँड

  सर्वसामान्यपणे कोणताही काटा शरीरात घुसला, तर होणाऱ्या वेदना तो काटा काढून टाकल्यावर कमी होतात; मात्र जिम्पाय हे झाड त्याला अपवाद आहे. याचे काटे इतके बारीक असतात, की शरीरात घुसल्यानंतर दिसतही नाहीत. त्यामुळे ते काढताना चुकून त्यांचा काही भाग त्वचेवरच राहिला, तर परिस्थिती बिकट होते. या झाडातल्या विषाचा उपयोग केमिकल वेपन अर्थात रासायनिक अस्त्राप्रमाणे करण्याचा विचार झाल्याचा उल्लेख काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंटरीजमध्ये आहे. पोर्टान डाउन या ब्रिटनच्या लॅबने यासाठी ऑस्ट्रेलियाचं सरकार आणि क्वीन्सलँड विद्यापीठाशी संपर्कही साधला होता.

  मरिना हर्ले नावाची महिला शास्त्रज्ञ काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या पर्जन्यवनांवर संशोधन करत होती. जंगलात अनेक धोके असतात, याची तिला कल्पना असल्याने तिने हातात वेल्डिंग ग्लोव्ह्ज आणि शरीरावर बॉडी सूट घातलेला होता. तरीही ती जिम्पाय जिम्पाय वनस्पतीच्या संपर्कात आल्यानंतर तिला प्रचंड त्रास झाला.

  वेदनांनी हैराण झालेल्या मरिनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हा तिचं सारं शरीर लाल पडलं होतं. जळजळ होत असल्याने ती किंचाळत होती. दुष्परिणाम कमी करण्यासाठी तिला बराच काळ हॉस्पिटलमध्ये राहून स्टेरॉइड्स घ्यावी लागली. या वेदना विजेच्या झटक्यासारख्या होत्या, असं तिने नंतर डिस्कव्हरीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. म्हणूनच पर्जन्यवनांमध्ये काम करणाऱ्यांसाठी, लाकडं तोडणाऱ्यांसाठी ही वनस्पती म्हणजे जणू मृत्यूचं दुसरं नावच होती.

  हे वाचा - जगातलं सर्वात महाग सँडवीच, किंमत ऐकून भूक मरेल... असं नेमकं काय आहे यात?

  या झाडाबद्दलची माहिती मिळाल्यानंतर जंगलात जाणाऱ्या व्यक्ती रेस्पिरेटर, मेटल ग्लोव्ह्ज आणि अँटीहिस्टामाइन टॅब्लेट घेऊन जाऊ लागले. या वनस्पतीची नोंद सर्वांत पहिल्यांदा 1866मध्ये करण्यात आली. त्या वेळी जंगलात जाणाऱ्या प्राण्यांचा आणि खासकरून घोड्यांचा भयानक वेदनांनी मृत्यू होऊ लागला. शोध घेतल्यानंतर ते सारे एकाच प्रकारच्या झाडाच्या संपर्कात आल्याचं दिसून आलं.

  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक जवानही या झाडाच्या संपर्कात आले. अनेकांनी वेदना असह्य झाल्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवन संपवलं. शिल्लक राहिलेले बाकीचे अनेक वर्षं वेदना सोसत राहिले. त्यानंतर या झाडाला सुसाइड प्लांट असं म्हटलं जाऊ लागलं. नंतर क्वीन्सलँड पार्क्स अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने जंगलात जाणाऱ्यांसाठ काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

  एवढं सगळं असलं, तरी अनेक प्रकारचे किडे आणि पक्षी या झाडाची फळं खातात आणि त्यांना काहीही त्रास होत नाही. हे झाड त्रासदायक असलं, तरी ते समूळ नष्ट केलं जाणार नाही. कारण तसं करणं परिसंस्थेच्या दृष्टीने हानिकारक असतं.

  First published:

  Tags: Tree, Viral