निखिल मित्रा/ रायपूर, 23 मार्च : देवपूजा म्हटली की अगरबत्ती आलीच. घरात सुगंध दरळवत ठेवून मन प्रसन्न करणारी ही अगरबत्तीही जीवावर बेतू शकते, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अगरबत्ती लावताना एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण असं एका महिलेसोबत घडलं आहे. साध्या अगरबत्तीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
सरगुजा जिल्ह्यातील. उदयपूरच्या पोतका गावात राहणारी ही महिला. रामपती राजवाडे असं या महिलेचं नाव. 50 वर्षांची रामपती जिचं किराणाचं दुकान होतं. घरासमोरच तिचं हे दुकान होतं. दुकान उघडल्यानंतर ती सर्वात आधी पूजा करायची त्यावेळी अगरबत्ती पेटवायची. त्यादिवशीही तिने अगरबत्ती पेटवून पूजा केली. पण तिच्यासोबत भयंकर घडलं. अगरबत्ती लावताच मोठी दुर्घटना घडली.
अगरबत्तीमुळे तिच्या दुकानात आग लागली. रामपतीही त्या आगीच्या विळख्यात सापडली. आगीने पेटलेली रामपती तशीच धावत दुकानाबाहेर आली. तिथं असलेली वाळू तिने आपल्या अंगावर टाकून कशीबशी आग विझवली. त्यानंतर तशीच ती कुटुंबाकडे गेली आणि त्यांना घटनेची माहिती दिली. तिची अवस्था पाहून सर्व घाबरले. तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
50 वर्षांपासून रामपतीचं तिच्या घरासमोरच त्यांचं किराणाचं दुकान होतं. तिथंच ते लोक पेट्रोलची विक्रीही करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान उघडल्यानंतर महिला अगरबत्ती पेटवून पूजा करत होती. तिथंच पेट्रोलचा डबा होता. या डब्यातच अगरबत्तीची ठिणगी पडली आणि आग लागली.
13 वर्षांपूर्वी गायब झालेला कॅमेरा नदीत सापडला; आत जे दिसलं ते पाहून मालकही शॉक
पूजेच्या ठिकाणी पेट्रोलचे डबे ठेवण्याची चूक किंवा पेट्रोलचे डबे असलेल्या ठिकाणी पूजा करण्याची चूक महिलेचा जीवावर बेतली. त्यामुळे अगरबत्तीची साधी ठिगणीही किती महागात पडू शकते, हे तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे अगरबत्ती लावताना तुम्ही अशी चूक करू नका. अगरबत्तीची ठिगणी पडून पेट घेईल अशी कोणतीही वस्तू तिथं ठेवू नका. नाहीतर आज या महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Local18, Viral