अमेरिका, 6 नोव्हेंबर : प्राणी (Animals) कधी कसे वागतील याची कल्पना करणं खूप कठीण आहे. अगदी पाळीव प्राणी असले तरीही ते प्राणीच आहेत, हे विसरून चालत नाही. खरं तर कुत्रा (Dog) हा माणसाचा चांगला मित्र मानला जातो. कुत्र्याइतका निष्ठावान प्राणी कोणीही नाही असं म्हणतात; पण कधीकधी कुत्रेही त्यांच्याबद्दलच्या मताला तडा जाईल असं भयंकर वर्तन करतात. त्यामुळे प्राण्यांशी वागताना काळजी घेणं आवश्यक असतं. काहीवेळा थोडासा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडू शकतो. असेच काहीसे अमेरिकेत (USA) राहणाऱ्या मारियासोबत (Maria) घडले. मारिया तिच्या मित्राच्या कुत्र्याचे लाड करत असताना त्या कुत्र्याने मारियाच्या ओठांचा लचकाच (Dog Bite Woman's Lip) तोडला. कुत्र्याचे लाड करणं इतकं महागात पडेल याची यत्किंचित कल्पनाही मारियाला नव्हती.
अमेरिकेतील उटाह (Utah) इथं राहणारी 48 वर्षीय मारिया तिच्या मित्राच्या कुत्र्याचे चुंबन घेण्यासाठी खाली वाकली; पण कुत्रा वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने मारियाच्या ओठांत आपले अणुकुचीदार दात घट्ट रोवले त्यामुळे मारियाचा वरच्या ओठाचा (Upper Lips) लचका पडला. आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक ठरणार आहे, याची तिला जराही कल्पना नव्हती. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे मारियाला मोठा धक्का बसला. बराच काळ ती या धक्क्यातून सावरली नव्हती.
हे ही वाचा-कल्याणमधील धक्कादायक VIDEO; माणसांमुळे द्यावी लागली बैलांना अग्निपरीक्षा
या घटनेच्या वेळी मारियाची बहीणही तिथं उपस्थित होती. तिनं हा सगळा प्रकार बघितला आणि मारियाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर मारियाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिच्यावर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करून तिचा चेहरा ठीकठाक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यामुळे मारियाचा वरचा ओठ पूर्णपणे कापला गेल्यानं तिचा सगळा चेहराच विद्रूप झाला.
या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली मारियाची बहिणी या भयानक प्रसंगाबाबत माहिती देताना म्हणाली की, मारिया आपल्या मित्राच्या कुत्र्याशी अगदी छान खेळत होती, त्याचे लाड करत होती, पण अचानक त्या कुत्र्याचा मूड कसा बदलला कोण जाणे? त्याला किस करायला खाली वाकलेल्या मारियाचे ओठ आपल्या जबड्यात पकडले आणि आपले अणुकुचीदार सुळे त्यात घुसवून वरच्या ओठाचा तुकडाच पाडला. बघता बघता मारियाच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.
या भयंकर अनुभवाचे वर्णन करताना मारिया म्हणाली की, तिला कुत्र्याची जात (Dog's Breed) ओळखता आली नाही. हा कुत्रा आक्रमक जातीचा आहे. त्याच्याशी खेळणे तिला चांगलेच महागात पडले आहे.
मारियावर आता उपचार पूर्ण झाले आहेत; पण तिनं कुत्र्यांचा इतका धसका घेतला आहे की, कुत्रा बघितला तरी तिला पॅनिक अटॅक (Panic Attack) येतो. आतापर्यंत तिच्या उपचारावर आतापर्यंत साडेसात लाख रुपये खर्च झाला असून, तिचा चेहरा आणखी चांगला करण्यासाठी आणखी काही शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे.त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी पैसा उभारण्याकरता मारियाचे कुटुंब आता फंड रेझिंगद्वारे (Fund Raising) पैसे जमा करत आहे.
मारियाबरोबर घडलेल्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यावर अनेकांनी तिच्याबद्दल हळहळ व्यक्त केली आणि त्याचबरोबर प्राण्यांबरोबर वागताना नेहमी सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Viral news