मराठी बातम्या /बातम्या /Viral /गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चिनी पोलिसांची अनोखी शक्कल, VIDEO Viral

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चिनी पोलिसांची अनोखी शक्कल, VIDEO Viral

chinese police

chinese police

गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

  जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतंही काम विनासायास आणि वेळेत पूर्ण होतं. पोलीस दलातही आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

  गुन्हेगारांना पकडण्यासाठी जगभरात विविध प्रकारच्या तंत्राचा वापर केला जातो. या बाबतीत चीन आघाडीवर आहे. चिनी पोलिसांना गुन्हेगाराचा चेहरा ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा चष्मा देण्यात आला आहे. या चष्म्यासमोर एखादा गुन्हेगार येताच लगेच अलार्म वाजतो आणि सर्व केंद्रांना मेसेज पोहोचतो. त्यानंतर तत्काळ अधिकारी आणि विशेष पथक घटनास्थळी पोहोचतं. कोणत्याही गुन्हेगाराला त्यातून सुटणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे, असं म्हटलं जातं.

  गुन्हेगारांना पकडण्यासाठी चिनी पोलीस चेहरा ओळखण्याचे तंत्र असलेल्या चष्म्याचा वापर करत आहेत. हे चष्मे सेंट्रल डेटाबेसशी जोडलेले असतात. या डेटाबेसमध्ये सर्व गुन्हेगारांच्या नोंदी ठेवल्या जातात. हा चष्मा घातलेला पोलीस जेव्हा एखाद्या संशयिताला पाहतो तेव्हा त्याची सर्व वैयक्तिक माहिती, म्हणजे नाव, लिंग, धर्म, पत्ता आणि गुन्हेगारी रेकॉर्ड, चष्म्यातल्या स्क्रीनवर झळकते. या खास तंत्रज्ञानाच्या मदतीने चिनी पोलिसांनी आतापर्यंत हजारो गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.

  व्हिडिओ होतोय व्हायरल -

  ट्विटरवर @songpinganq या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांनी एखाद्याकडे पाहिल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसू लागल्याचं तुम्ही पाहू शकता. या चष्म्याच्या उजव्या बाजूला एक छोटा कॅमेरा लावलेला असतो. जेव्हा एखादा पोलीस कर्मचारी एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, तत्क्षणी कॅमेरा त्याचा फोटो कॅप्चर करतो आणि डेटाबेसवर पाठवतो. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती चष्म्याच्या स्क्रीनवर दिसू लागते. या माहितीच्या आधारे पोलीस कारवाई करतात. हा कॅमेरा इतका स्पष्ट फोटो काढतो, की गर्दीतूनही पळून जाणं अशक्य होतं.

  आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे 7 जीव, जन्म देताच त्यांना खातात; कारणही शॉकिंग

  एका चष्म्याची किंमत आहे 56 हजार रुपये -

  हा विशेष सनग्लास मोबाइल युनिटद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. एका चष्म्याची किंमत 700 डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच 56 हजार रुपये आहे. हा चष्मा केवळ 100 मिली सेकंदात सर्व्हरवर प्रीलोड केलेल्या 10 हजार नमुन्यांपैकी एकाला पटकन ओळखू शकतो. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 22 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याच्या चीनच्या क्षमतेचं कौतुक केलं जात आहे.

  First published:
  top videos

   Tags: China, Crime, International, Police