नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : चोर, लुटारू आणि तशाच पद्धतीने विचार करणारी माणसं नेहमी यंत्रणेतील कच्चे दुवे शोधता आणि त्याचा गैरफायदा घेऊन चोरी किंवा लूट करतात. भारतातच नव्हे तर जगभर या चोरांना वेगवेगळ्या युक्त्या सुचत असतात. त्याचा अवलंब करून ते चोरी करतात. त्यांच्या या कल्पना आश्चर्यकारक असतात. त्या योग्य ठिकाणी वापरल्या तर कधीकधी रचनात्मक कामंही उभी राहू शकतात. पण ते तसं करत नाहीत.
अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील एका महिलेने खोटी कुपन्स छापून ती विकली आणि 32 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 240 कोटी रुपयांची लूट केली आहे. ही सगळी घटना प्रचंड आश्चर्यचकित करणारी आहे.
या महिलेने वेगेवगळ्या कंपन्यांची कुपन्स छापून घेतली आणि त्या माध्यमातून घराची दुरुस्ती आणि सुट्टीवर फिरायला जाण्याचा फायदा करून घेतला. आता या महिलेला अटक केली असून तिथल्या कोर्टाने तिला 12 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
41 वर्षांच्या लॉरी एन विलानुएवा टॅलेंसने घरी डिझाईन आणि प्रिंट केलेली हजारो कूपन्स 2 हजार ग्राहकांच्या नेटवर्कमध्ये वितरित केली. तिने मास्टरशेफ नावाच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून हे नेटवर्क उभारलं होतं. हे नेटवर्क तयार करण्यासाठी तिनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही वापरले होते. पोलिसांनी तिच्या घरी धाड टाकल्यावर त्यांना 1 मिलियन डॉलर किमतीची बनावट कुपन्स सापडली.
आपल्या ग्राहकांना सवलतीच्या दरांत त्यांच्या सेवा किंवा वस्तू मिळाव्यात यासाठी अनेक कंपन्या कुपन्स देत असतात. अशीच हुबेहूब कुपन्स लॉरीने डिझाइन करून छापून घेतली. ही कुपन्स तिनी 2000 हून अधिक जणांना विकली. यातून तिने लोकांना लुटलं. ही कुपन्स खरेदी केलेले ग्राहक जेव्हा कंपन्यांकडे कुपन वापरायला गेले तेव्हा त्या दुकानदारांना आणि कंपन्यांना ती कुपन्स बनावट असल्याचं लक्षात आलं.
लॉरी कुठल्याही किराणा दुकान किंवा मेडिकल स्टोअरच्या नावाने कुपन्स तयार करू शकत होती आणि ती हव्या त्या किमतीला ती विकत होती. उदाहरणच द्यायचं झालं तर 25 अमेरिकी डॉलरचा डायपरचा डबा असेल तर त्यावर लॉरी 24.99 डॉलरचं कुपन उपलब्ध करून द्यायची म्हणजे ग्राहकाला वाटायचं की आपल्याला कुपन मोफतच मिळतंय.
या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी जेसन थॉमसन म्हणाले,‘लॉरीच्या जॅकेटच्या प्रत्येक कप्प्यात कुपन होती. लॉरीनी प्रॉक्टर अँड गँबल, कोका-कोला आण जिप्लोक या कंपन्यांसह 100 कंपन्यांची बनावट कुपन्सही तयार केली होती. लॉरीने या सगळ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात लुटलं असून सर्वाधिक फसवणूक कागद उत्पादक कंपनी किंबर्ली-क्लार्कची झाली आहे.’
FBI ला लॉरीच्या कॉम्प्युटरमध्ये 13 हजार उत्पादनांशी संबंधित कुपन्सची डिझाइन्स सापडली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बनावट कुपन्सच्या माध्यमातून लॉरीने 31.8 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 240 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. असे अनेक घोटाळे जगाच्या पाठीवर होत असतात. पण पोलीस त्याच्या पुढे जाऊन विचार करतात आणि ते उघड करतात. त्यामुळेच आपण सुरक्षित राहतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news