वॉशिंग्टन 25 मे: इंटरनेटवर कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल आणि एखाद्याला रातोरात स्टार बनवेल, हे काही सांगता येत नाही. अशाच एका व्हिडिओनं (Viral Video) 14 वर्षापूर्वी यूट्यूबवर (YouTube) अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 55 सेकंदाच्या या व्हिडिओ या कुटुंबाचं नशीबच पालटलं होतं. दोन चिमुकल्यांचा हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला की याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात आता या व्हिडिओचा NFTच्या रुपात लिलावही करण्यात आला आहे. याची अंतिम बोली 5 कोटी रुपये लागली आहे. या व्हिडिओचं नाव चार्ली बीट माय फिंगर असं आहे. याचं चित्रीकरण यूएसमध्ये झालं आहे. यूएसमध्ये राहाणारे एका आयटी कंपनीचे मॅनेजर हॉवर्झ डेविस-कैर यांनी हा व्हिडिओ मे 2007 मध्ये यूट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या हॅरी आणि चार्लीचं वय तीन आणि एक वर्ष होतं. व्हिडिओमध्ये हॅरी आणि चार्ली एकसोबत एका खुर्चीवर बसले होते. त्यावेळी चार्ली हॅरीच्या बोटाला चावला होता. हॉवर्ड यांनी सांगितलं, की ज्यावेळी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला तेव्हा त्यांनी केवळ गंमत म्हणून त्या व्हिडिओकडे पाहिलं. मात्र, काही महिन्यांनंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी गेले असता त्यांच्या असं लक्षात आलं, की व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ 883 मिलियन वेळा पाहिला गेला होता आणि तो सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमधील एक होता.
या व्हिडिओनं दोन्ही भावांना इंटरनेटवर हिरो केलं. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला. या व्हिडिओला अनेक जाहिराती मिळाल्या आणि यातून मागील काही वर्षात लाखोंची कमाई झाली. या व्हिडिओमध्ये दिसणारी लहान मुलं आता मोठी झाली आहेत. हॅरी आता सहा फूट उंच झाला आहे. पंधरा वर्षीय चार्लीही सध्या शिक्षण घेत आहे. हॉवर्ड यांनी सांगितलं, की हा व्हिडिओ या चिमुकल्यांच्या आजी-आजोबाला पाठवण्यासाठी बनवण्यात आला होता. हॉवर्ड यांनी सांगितलं, की ईमेलवरुन हा व्हिडिओ पाठवण्यासाठी त्याची साईज खूप मोठी होती. त्यामुळे, तो खासगी यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. मात्र, तो प्रचंड लोकप्रिय झाला.