मुंबई, 24 ऑगस्ट- गर्भधारणा आणि मूल जन्माला घालणं हा महिलांच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. हा कालावधी महिलांना मानसिकदृष्ट्या समृद्ध करणारादेखील असतो. अलीकडच्या काळात महिलांच्या बाबतीत प्रसूतीदरम्यान किंवा मूल जन्माला आल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी घडल्याचं आपण ऐकतो, वाचतो. सध्या दोन जुळ्या जोडप्यांची एक खास गोष्ट जोरदार चर्चेत आहे. जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांशी विवाह केला. विवाहानंतर या जोडप्याला मुलं झाली. परंतु, ही मुलं एकमेकांची केवळ भावंडंच नाहीतर त्यांचे डीएनए हे एकच असल्याचं स्पष्ट झालं आहे. `डेली मेल`ने या विषयीची माहिती दिली आहे. जुळ्या भावांशी लग्न करणाऱ्या आणि एकाचवेळी गर्भधारणा झालेल्या जुळ्या बहिणींनी, त्यांना झालेली मुलं ही एकमेकांचे केवळ चुलत भाऊच नाहीत तर त्यांचे डीएनए एकच आहेत, असं जाहीर केलं आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील 35 वर्षांच्या ब्रियाना आणि ब्रिटनी डीन या जुळ्या बहिणींचा जोश आणि जेरेमी सॅलियर्स या जुळ्या भावांशी विवाह झाला. या दोन्ही जोडप्यांना जॅक्स आणि जेट ही मुलं आहेत. या दोन्ही मुलांच्या वयात फक्त तीन महिन्यांचं अंतर आहे. जॅक्सचा जन्म एप्रिलमध्ये झाला असून जेटचा जन्म जानेवारीत झाला आहे. हे दोघंही एकमेकांचे क्वॉटरनरी ट्विन्स म्हणजेच चुलत भाऊ असूनही त्यांचा डीएनए समान आहे. या कुटुंबाने त्यांच्या संयुक्त इन्स्टाग्राम पेजवर याविषयी खुलासा केला असून ही बाब समजताच त्यांच्या 2,19,000 सोशल मीडिया फॉलोअर्सना धक्का बसला आहे. या पोस्टवर हजारो लोकांनी त्यांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ व्यक्त करण्यासाठी कमेंट केल्या असून, काहींनी या विषयावर उत्तरंही दिली आहेत. या जोडप्यांच्या लग्नाविषयी कहाणी देखील काहीशी रोचक आहे. ही दोन्ही कपल्स ऑगस्ट 2018 मध्ये ओहियोमधल्या ट्विन्सबर्ग येथे विवाहबद्ध झाली. ऑगस्ट 2020 मध्ये बेवॉच थीमवर आधारित खास कपडे परिधान करत फोटोशूटद्वारे या जोडप्यांनी प्रेग्नसीविषयीची माहिती शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ``अंदाज सांगा काय? दोन्ही कपल्स गरोदर! गर्भधारणेचा अनुभव घेत आहोत. ही बातमी तुम्हासोबत शेअर करताना आम्ही रोमांचित आणि कृतज्ञ झालो आहोत,`` असं लिहिलं होतं. 2017 मध्ये ब्रिटनी आणि ब्रायना या दोघी जुळ्यांसाठी खास आयोजित केल्या जाणाऱ्या एका महोत्सवात जोश आणि जेरेमीला भेटल्या. या दोघांनी सहा महिन्यांनंतर ब्रिटनी आणि ब्रायना यांना प्रपोज केलं होतं. या दोघांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्यासह 17 जुळी मुलं उपस्थित होती. हा विवाहसोहळा फेब्रुवारी 2019 मध्ये अवर ट्विन्सेन वेडिंग या शीर्षकाखाली टीएलसी स्पेशल या वाहिनीवर प्रसारित झाला होता. **(हे वाचा:** पायाच्या नखामुळे गर्लफ्रेंडसमोर आलं बॉयफ्रेंडचं सत्य, संपूर्ण किस्सा जाणून बसेल धक्का ) ``या बहिणींना भेटण्यापूर्वी, मी आणि माझा जुळा भाऊ जोश याने आम्ही फक्त जुळ्या मुलींशीच विवाह करणार,`` अशी शपथ घेतल्याचं जेरेमीनं सांगितलं. ``या बहिणी आम्हाला भेटल्याने आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणतीही नाही,`` असं जेरेमी सांगतो.दरम्यान, 21 जानेवारी 2021 रोजी ब्रिटनीने तिच्या मुलाच्या जन्माची घोषणा इन्स्टाग्रामद्वारे केली. या वेळी बाळाचे वडील जोश यांनी या फोटोखाली एक कॅप्शन लिहिलं होतं. ``ब्रिटनीनं प्रसूतीदरम्यान आश्चर्यकारक कामगिरी केली. मला तिचा खूप अभिमान आहे. जेटचा पिता झाल्याने मला खूप आनंद होत आहे.`` असं त्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. काही महिन्यांनंतर ब्रियाना आणि जेरेमेनीनं आपल्या बाळाचा म्हणजेच जॅक्स सॅलियर्सचा फोटो शेअर केला होता. मात्र या दोन्ही मुलांचा डीएनए एकच असल्याचं स्पष्ट झालं आहे. क्वॉटरनरी ट्विन्स ही एक शास्त्रीय संकल्पना आहे. यानुसार दोन मुलांचे पालक किंवा डीएनए समान नसतात. ते चुलत भाऊ किंवा बहीण असतात. परंतु, अनुवंशिकदृष्ट्या ते एकाच पालकांच्या पोटी जन्मलेल्या भावंडांसारखे असतात. शारीरिकदृष्ट्या ते सारखेच दिसतात. या संकल्पनेत पालक वेगवेगळे दोन असतात पण डीएनए मात्र एकच असतो. तज्ज्ञ शास्त्रीयदृष्ट्या अशा मुलांना जुळे मानत नाहीत. तसंच या संकल्पनेवर अजून फारसा अभ्यासदेखील झालेला नाही. **(हे वाचा:** पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकली पत्नी, भाजप नेत्याची रस्त्यावरच चपलेनं धुलाई, Video Viral ) जॅक्स आणि जेटच्या जन्माविषयी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटिझन्सनं कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ``जुळ्या मुलांचा डीएनए एकच असतो. जेव्हा दोन जुळी मुलं लग्न करतात, तेव्हा त्यांची मुलं अनुवंशिक भावंड होतात, ``अशी कमेंट एकानं केली आहे. ``जेव्हा जुळ्या मुलांची जोडी जुळ्या मुलींसोबत विवाह करते त्याला क्वॉटरनरी विवाह म्हणतात. जुळ्या मुलांमध्ये अनुवंशिक सामग्री, अंडी-शुक्राणू आणि सर्व गोष्टी एकच असतात (जेव्हा जुळी मुलं वेगळ्या अंडी आणि शुक्राणूपासून जन्माला येतात),`` अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. ``मुळात दोघांवर गुन्हा दाखल होणं अशक्य आहे, `` असा प्रश्नार्थक विनोद एका युजरनं कमेंटमध्ये केला आहे. ``ते 99.9 टक्के भाऊ असतील. कृपया डीएनए टेस्ट करून घ्या आणि आम्हाला दाखवा. ते खरं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,`` असं अजून एक युजर कमेंट करताना म्हणतो. याबाबत `एनबीसी न्यूज`शी बोलताना ब्रिटनीने चाहत्यांच्या सिद्धांताची पुष्टी केली. ती म्हणाली, ``मुलांची अनोखी स्थिती त्यांना चुलत भावांपेक्षा अधिक जवळून संबंधित करते. ते नऊ महिन्यांपेक्षा कमी अंतराने जुळ्या पालकांच्या पोटी जन्माला आले. जगात फक्त 300 क्वॉटरनरी विवाहांची नोंद आहे.```एंटरटेनमेंट टूनाईट`शी बोलताना जेरेमीनं सांगितलं की, ``मला वाटतं की मी जेटचा पालक आहे आणि जोशला जॅक्सबद्दल असंच वाटत असावं. आम्ही मुलांचं एकत्र संगोपन करत आहोत. त्यामुळे ते फक्त एकाच कुटुंबासारखं वाटतं.``
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.