मुंबई, 06 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिन्याला 'मंथ ऑफ लव्ह' म्हणतात. या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन्स डे’ (14 फेब्रुवारी) असतो. या दिवशी अनेकजण आपल्या जोडीदाराला एखादी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करतात. भेटवस्तू देणं शक्य झालं नाही तर निदान एखादा लाल रंगाचा गुलाब तर नक्कीच देतात. व्हॅलेंटाइन्स डेच्या भेटवस्तू प्रामुख्यानं लाल रंगाच्या असतात. कारण, लाल रंगाला प्रेमाचं प्रतीक मानतात.
चीन आणि भारतासारख्या आशियाई देशांमध्ये तर लाल रंगाला सौभाग्य आणि समृद्धीचाही रंग मानलं जातं. लग्न सोहळ्यांमध्ये नववधूदेखील याच रंगाचे कपडे घालतात. लाल रंग आणि प्रेमाचा संबंध का जोडला गेला आहे.
लाल रंग हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सर्वांत भडक आणि आकर्षक रंगांपैकी एक आहे. विविध कारणांसाठी लाल रंगाचा वापर केला जातो. प्राचीन काळापासून धोक्याची सूचना देण्यासाठी लाल रंग वापरला गेला आहे.
BF प्रियकरासाठी काही हटके आणि Interesting Valentine Wishes In Marathi
संपूर्ण इतिहासात विविध भाव आणि भावनांशी लाल रंगांचा संबंध जोडला गेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या लाल रंग हा धैर्य आणि बलिदानाचं प्रतीक आहे. मध्ययुगात, रोमन कॅथोलिक पोप आणि कार्डिनल्स येशू ख्रिस्त व ख्रिश्चन शहीदांच्या बलिदानाचं प्रतीक म्हणून लाल रंगच वापरायचे. लाल हा रंग राग आणि आक्रमकतेशी संबंधित आहे.
प्राचीन काळी, लाल हा युद्धाची देवता मंगळाचा रंग मानला जात असे. हिंसा, युद्ध आणि आक्रमकतेचा प्रतीक असलेला रंग प्रेमाशी कसा जोडला गेला, याची गोष्ट रंजक आहे.
इतिहासाचा धांडोळा घेतला असता असं आढळतं की, ग्रीक आणि हिब्रू लोक लाल रंगाला प्रेमाचे प्रतीक मानत होते. रोमन दे ला रोज (रोमान्स ऑफ द रोझ) ही मध्ययुगीन साहित्यातील सर्वांत लोकप्रिय कवितांपैकी एक आहे. 13व्या शतकातील फ्रेंच कवितेत प्रेम आणि लाल गुलाबाच्या फुलांचं रूपक वापरलेलं आहे.
सेंट व्हॅलेंटाइन्स
व्हॅलेंटाइन्स डेच्या संदर्भात असं म्हणतात की, 14 फेब्रुवारी 269 या दिवशी सेंट व्हॅलेंटाइन्स या रोमन कॅथलिक धर्मगुरूला फाशी देण्यात आली होती. सेंट व्हॅलेंटाइन्स आणि सम्राट क्लॉडियस समकालीन होते. सम्राटानं तरुण लोकांच्या विवाहावर बंदी घातली होती. त्याचा असा विश्वास होता की, विवाहित पुरुष प्रभावी सैनिक बनवू शकत नाहीत. याउलट, ख्रिश्चन चर्चचा असा विश्वास होता की विवाह पवित्र असतो. म्हणून सेंट व्हॅलेंटाइन्सनं अनेक जोडप्यांची गुप्तपणे लग्न लावून दिली होती. याच कारणामुळे त्यांना फाशी देण्यात आली होती.
लाल रंग आणि शारीरिक आकर्षण यांच्यातील संबंध
प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरल्या जाणार्या लाल रंगाच्या परंपरेवर ऐतिहासिक प्रभाव आहे. शारीरिक आकर्षण आणि लाल रंगाचा संबंध हेदेखील प्रेमासाठी लाल रंग वापरण्याचं कारण असल्याचं म्हटलं जातं. सायकॉलॉजिस्ट अँड्र्यू जे. इलियट आणि डॅनिएला निएस्टा (2008) यांनी केलेल्या रिसर्चमध्ये, पुरुषांना लाल आणि निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या महिलांचे फोटो दाखवण्यात आले होते.
रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या ज्या पुरुषांना लाल रंगाचे कपडे घातलेल्या महिलांचे फोटो दाखवण्यात आले होते त्या महिला अधिक आकर्षक आणि सेक्शुअली डिझायरेबल वाटल्याचं निदर्शनास आलं. इलियट, निएस्टा आणि इतरांनी 2010मध्ये काही महिलांसोबत असाच प्रयोग करून बघितला. या महिलांनाही लाल रंगाचे कपडे घातलेले पुरुष जास्त आकर्षक आणि सेक्शुअली जास्त अपीलिंग वाटले.
खरं तर लाल रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्ती जास्त आकर्षक वाटणं ही काही नवीन बाब नाही. ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये लाल रंग लैंगिक उत्कटतेशी संबंधित मानला गेला आहे. या मागील कारण संशोधकांसाठी खूप चर्चेचा विषय आहे. लाल रंगाच्या आकर्षकपणाबद्दलच्या आपल्या धारणांवर काय प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी जीवशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावतं. उपलब्ध असलेल्या बहुतांशी संशोधनांमध्ये, असं गृहितक आहे की ओव्ह्युलेशनच्यावेळी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत होणारे बदल त्यांच्या आकर्षकपणाची पातळी वाढवू शकतात. ओव्हुलेशनच्या वेळी, शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. यामुळे लैंगिक स्वारस्य आणि उत्तेजनांशी संबंधित लाल फ्लश तयार होतो.
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि जैविक संबंध
लाल रंग आणि प्रेम यांच्यातील संबंधाला ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा जैविक अर्थ आहे. जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा आपल्याला आनंदाचा अनुभव येतो. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा त्याच्यावर रागावतो तेव्हा त्याच्याबाबत उत्कटता अनुभवतो. या व्यक्तीला गमावण्याची भीती आपल्या मनात असते. या सर्व भावना आपल्या प्रेमाच्या अनुभवांशी जोडल्या जातात. त्यामुळे या भावनांशी संबंधित असलेल्या रंगाचा म्हणजेच लाल रंगाचा आणि प्रेमाचा संबंध जोडला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Social media, Top trending, Valentine Day, Valentine day plans, Valentine week, Viral