देहरादून, 23 जानेवारी: प्रेमात हृदय तुटल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. साधारणतः प्रेमभंग झालेल्या व्यक्ती त्यांच्या या कहाण्या मनातच दाबून ठेवतात. परंतु देहरादूनचे दोन भावंडं मात्र याला अपवाद ठरले आहेत. कारण लॉकडाऊनच्या काळात प्रेमभंग झाल्यानंतर त्यांनी थेट 'दिल टुटा आशिक चायवाला' नावाचं कॅफे सुरू केलं आहे. इतकंच नाही तर, येथे चहाच्या चुस्क्या घेताना, ग्राहकांच्या हृदयातील प्रेमाच्या भावना चिठ्ठीत लिहिण्याची सुविधा आहे. जेणेकरून प्रेमभंग झालेल्या व्यक्तीच्या हृदयाच्या वेदना कमी होऊन त्याचं मन हलकं होऊ शकेल.
देहरादूनमधील 'दिल टुटा आशिक चायवाला कॅफे' आता प्रेमभंग झालेल्या लोकांसाठी एक नवीन अड्डा बनत चालला आहे. प्रेमभंग झालेली लोकं येथे येतात आणि चहा पिताना आपल्या हृदयातील भावनांना मोकळी वाट करून देत आहेत. ते हृदयात दबलेल्या आपल्या भावना कागदावर लिहून आपल्या हृदयाचे हाल सांगत आहेत. देहरादूनमधील जीएमएस रोडवरील हे कॅफे 2 भावंड चालवतात. ज्यांचा लॉकडाऊनच्या काळात प्रेमभंग झाला होता. म्हणून दोघांनी एकत्र येऊन हा कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॅफे सुरू करण्यामागील हेतू त्यांना विचारला असता, त्यांनी सांगितलं की, प्रेमामध्ये फसवणूक झालेल्या लोकांनी नैराश्यात जाऊ नये, म्हणून आम्ही हा कॅफे सुरू केला आहे.
हे ही वाचा-मध्यरात्री चेक करीत होता ईमेल; INBOX मध्ये जे पाहिलं त्यामुळे झोपूच शकला नाही
राहुल बत्रा आणि दिव्यांशु असं या दोन भावंडाची नाव असून ते 'दिल टुटा आशिक कॅफे' चालवतात. त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात त्यांचा प्रेमभंग झाला, ज्यामुळे त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांना वाटलं की, आयुष्यात दुःखाला गोंजरत न बसता काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी महिनाभरापूर्वी 'दिल टुटा आशिक चायवाला' नावाचं एक कॅफे सुरू केलं आहे. या कॅफेचं नाव लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. याठिकाणी लोकं येऊन त्यांच्या हृदयात दबलेल्या गोष्टी सर्वांसोबत शेअर करत आहेत. तसेच तेथील एका बोर्डवर ते त्यांच्या हृदयाची स्थिती देखील लिहू शकतात. जेणेकरून त्यांचं मन हलकं व्हायला मदत होते. लोकांनी या कॅफेबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कॅफेचं नाव खूप खास आहे आणि येथे येऊन छान वाटतं. सायंकाळी बरीच लोकं येथे येत आहेत. महिन्याभरापूर्वी उघडलेला हा कॅफे त्याच्या नावामुळे खूपच चर्चेत आहे. शिवाय प्रेमभंग झालेल्या व्यक्ती चहा पिताना त्यांच्या हृदयाची स्थिती देखील सांगत आहेत.