कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 12 जून : आता बिहारहून अत्यंत जलदगतीने झारखंडला पोहचता येणार आहे. त्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 6:55 वाजता पाटण्याहून निघालेली ही एक्स्प्रेस 8:20 वाजता गया जंक्शनला पोहोचली आणि थेट रांचीला रवाना झाली. पाटणा ते रांची हे अंतर अवघ्या 6 तास 05 मिनिटांत पूर्ण करण्याची या एक्स्प्रेसची क्षमता आहे. तर गया ते रांचीला जाण्यासाठी सुमारे 4 तास 30 मिनिटे लागतील. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. आतापर्यंत गया ते रांची या प्रवासासाठी किमान 6 तास लागायचे. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसमधून पाटणा ते गयाचा प्रवास केवळ 1 तास 25 मिनिटांत पार पडणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरच प्रवाशांना पाटणा ते रांची अशी सुविधा मिळू शकेल. पाटणा स्थानकाहून सुरू होणारी ही एक्स्प्रेस जहानाबाद, गया, कोडरमा, हजारीबाग टाउन, बरकाकाना, मेसरा स्थानकांहून रांचीला पोहोचेल. त्याचप्रमाणे, रांचीहून सुरू होऊन मेसरा, बरकाकाना, हजारीबाग टाउन, कोडरमा, गया आणि जहानाबाद स्थानकांवरून पाटणात दाखल होईल.
कसं असेल वेळापत्रक? सकाळी 6:55 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस पाटणा स्थानकाहून रवाना होईल. सकाळी 8:20 वाजता गया स्थानकावर पोहोचेल. सकाळी 8:30 वाजता गया स्थानकावरून रवाना होऊन ही एक्स्प्रेस दुपारी 1:00 वाजता रांचीला पोहोचेल. दुपारी 2:20 वाजता एक्स्प्रेस रांची स्थानकावरून माघारी निघेल. संध्याकाळी 7:00 वाजता पुन्हा गया स्थानकावर येईल. गया स्थानकावरून संध्याकाळी 7:10 वाजता निघालेली एक्स्प्रेस पाटणा जंक्शनला रात्री 8:25 वाजता पोहोचेल. Thane News : देणाऱ्याने देत जावे, एरोस्पेसाठी काम करणारे हात घडवत आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य, पाहा Video दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस रांचीहून पाटण्याला 6 तास 5 मिनिटांत दाखल होईल. तर गयाहून रांचीला जाण्यासाठी केवळ 4 तास 30 मिनिटे लागतील. ताशी 100-130 किलोमीटर वेगाने ही एक्स्प्रेस धावेल. तर, काही मार्गांवर हा वेग तासाला 180 किलोमीटरपर्यंत जाईल. गया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक उमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. लवकरच प्रवाशांना पाटणा ते रांचीला जाण्याची सुविधा मिळू लागेल. दरम्यान, या एक्स्प्रेसचे प्रवासी भाडे अद्याप ठरलेले नाही. परंतु वेळापत्रक निश्चित होताच भाडेही निश्चित केले जाईल.