नवी दिल्ली 02 जून : खूप जास्त अभ्यास आणि तासंतास सुरू असलेल्या ऑनलाईन क्लासला (Online Classes) वैतागलेल्या एका चिमुकलीनं याबाबतची तक्रार करणारा आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. तिनं थेट पंतप्रधान मोदींना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. काश्मिरच्या या सहा वर्षाच्या चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Kashmiri Girl) झाला. हा व्हिडिओ इतका शेअर झाला की याची दखल थेट जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शालेय मुलांवरील दबाव कमी करण्यासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शैक्षणिक धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी याबाबत ट्विट करत त्यांनी लिहिलं, की शालेय शिक्षण विभागानं पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या दैनंदिन ऑनलाईन क्लासेसचं टाइमिंग दीड तास करण्याचं ठरवलं आहे. हे क्लास दोन टप्प्यात होतील. तर, नववी ते बारावीच्या क्लाससाठी तीन तासाहून अधिक वेळ सेशन होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
A six-year-old Kashmiri girl's complaint to @PMOIndia @narendramodi regarding long hours of online classes and too much of school work. pic.twitter.com/S7P64ubc9H
— Aurangzeb Naqshbandi (@naqshzeb) May 29, 2021
याआधीही मनोज सिन्हा यांनी ट्विट केलं होतं, की खूपच प्रेमळ तक्रार. शालेय मुलांवरील होमवर्कचं ओझं कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 48 तासांत योग्य ते धोरण आखण्याचे निर्देश दिले आहेत. लहानपणाची निरागसता हे देवानं दिलेलं वरदान आहे आणि या बालपणाचे दिवस आनंदी, जिवंत आणि उत्साहात जाणं, गरजेचं आहे. माहिरा नावाच्या या चिमुकलीनं ऑनलाईन क्लासबाबत आणि होमवर्कबाबत व्हिडिओ शेअर करत पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. यात ही चिमुकली म्हणत होती, की आमचा ऑनलाईन क्लास सकाळी दहा वाजता सुरू होतो आणि दुपारी दोन वाजता संपतो. यात आम्हाला इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएसचे क्लास करावे लागतात. हे सांगत तिनं सवाल उपस्थित केला होता, की मोदीजी लहान मुलांना एवढं काम का करावं लागतंय? तिच्या तक्रारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर इतर मुलांच्या पालकांनीदेखील ऑनलाईन क्लासच्या वेळेविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली.