आपल्याला नेहमी असं पाहायला मिळतं, की जी दाम्पत्यं (Couples) समवयस्क नसतात, त्यांच्याकडे लोक थोड्या तिरक्या नजरेनं पाहतात. त्या दाम्पत्याशी आपल्याला काही देणंघेणं असो वा नसो, पण अशा वयाचं अंतर असलेल्या दाम्पत्याकडे बघून अनेक जण नाकं मुरडतात. त्यांच्यावर काही भाष्य करणं हा आपला अधिकारच आहे, असं ते समजतात. असंच काहीसं ब्रिटनमधल्या (UK) 50 वर्षांच्या एका महिलेला अनुभवावं लागतं. अॅलिस लॉर्ड (Alice Lord) असं या महिलेचं नाव असून, तिने हॉटस्पॉट मीडियाने साधलेल्या संवादात तिने आपली कहाणी शेअर केली. ‘माझ्या 31 वर्षीय जोडीदाराला बहुतांश लोक माझा मुलगाच समजतात,’ असं अॅलिस यांनी सांगितलं. बेन शार्प (Ben Sharp) असं अॅलिस यांच्या जोडीदाराचं नाव आहे. अॅलिस म्हणाल्या, की सुरुवातीला हे ऐकल्यावर त्यांचा मूड खराब व्हायचा; मात्र नंतर असे प्रकार वाढल्यानंतर त्यांनी आपला मूड खराब करून घेण्यापेक्षा लोकांची फिरकी घ्यायला सुरुवात केली. ब्रिटनमधल्या स्टॅफर्डशायरमधल्या (Staffordshire) स्टॅफर्ड (Stafford) इथं हे दाम्पत्य राहतं. ऑगस्ट 2018मध्ये दोघांच्या समान मित्रांच्या ओळखीतून एका ओपन माइक नाइट इव्हेंटमध्ये (Open Mike Night Event) अॅलिस आणि बेन यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांच्यातल्या या नात्याला दोघांच्याही कुटुंबीयांकडून परवानगी मिळाल्यानंतर हे दाम्पत्य एका घरात राहू लागलं. पेशाने अकाउंट मॅनेजर असलेल्या अॅलिस सांगतात, की आम्हाला दोघांना एकत्र पाहिलं, की लोक हमखास काही तरी टिप्पणी करतात. त्यानंतर त्यांच्या जोडीदाराने अशा व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी एक क्लृप्ती शोधून काढली. एकदा एका पबबाहेर अॅलिस आणि बेन एकमेकांना मिठी मारत होते, तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या काही तरुणी त्या दोघांकडे रोखून पाहू लागल्या. त्यानंतर बेन यांनी अॅलिसला किस केलं आणि सांगितलं, ‘म्हणूनच बाबा तुम्हाला प्यायला देत नाहीत.’ हे ही वाचा- लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण बेन यांच्या तोंडचं हे वाक्य ऐकल्यानंतर बाजूच्या त्या तरुणींचे चेहरे पाहण्यासारखे झाले. त्यानंतर या दाम्पत्याने ठरवूनच टाकलं, की आपल्याला जज करणाऱ्या किंवा आपल्याकडे संशयाने पाहणाऱ्या किंवा काही टिप्पणी करणाऱ्या व्यक्तींची आपण अशीच फिरकी घ्यायची. बेन यांनी ही क्लृप्ती काढली, जेणेकरून अॅलिस यांनी लोकांच्या टिप्पण्या मनाला लावून घेऊ नयेत. अॅलिस यांना अलीकडेच 50 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की बेन यांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यात वयाचा कोणताही अडथळा नाही आणि त्याचा विचारही ते करत नाहीत. अॅलिस सांगतात, की बेन यांना जेव्हा त्या पहिल्यांदा भेटल्या होत्या, तेव्हा बेन यांनी त्यांच्याशी फ्लर्टिंग करताना सांगितलं होतं, की त्या आता केवळ 22 वर्षांच्या असल्यासारख्याच दिसतात. अॅलिस यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन 14 वर्षं झाली असून, त्यांना 20 वर्षांची एक मुलगीही आहे. अॅलिस यांनी बेन यांना भेटीच्या पहिल्याच दिवशी या साऱ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. हे सगळं माहिती झाल्यानंतरही बेन यांनी अॅलिस यांना किस केलं आणि त्यांना घरापर्यंत सोडायलाही ते आले होते, अशी आठवण अॅलिस यांनी सांगितली. दोघांनी एकमेकांशी फोन नंबर्स शेअर केले. बेन यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर अॅलिस यांना असं वाटलं होतं, की त्या कदाचित पुन्हा त्यांना भेटू शकणार नाहीत; मात्र थोड्याच दिवसांत बेन यांनीच त्यांना डेटवर जाण्यासाठी विचारलं. त्यानंतर काही दिवसांनी अॅलिस यांनी आपल्या मुलीशी हे सारं शेअर केलं. ती मुलगी बेन यांच्यापेक्षा फक्त 9 वर्षांनीच लहान आहे. तरीही तिने हे सारं सहजगत्या स्वीकारलं. तिच्या मित्रमंडळींकडून या नात्याची चेष्टा केली जात असल्याचं, तसंच ते सारे बेन यांना टॉयबॉय असं संबोधत असल्याचं अॅलिस यांची मुलगी सांगते. ती मात्र त्या साऱ्यांना असं न म्हणण्याचा आग्रह करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.