मुंबई, 22 जुलै- स्त्री-पुरुष समानता, मुलं-मुली एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतात, मित्र होऊ शकतात, असं अनेकदा बोललं जातं. पण आजही आपल्या समाजात अनेक बुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत जे या गोष्टी समजून घेत नाहीत. अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं महत्त्वाचं असतं. केरळमधील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अशाच स्वयंघोषित ‘नैतिक पोलिसांना’ चांगलाच धडा शिकवला आहे, तेही त्यांच्याच भाषेत. सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे. ‘दी इंडियन एक्सप्रेस’च्या वेबसाईटवर याबद्दल सविस्तर वृत्त देण्यात आलं आहे. केरळमधल्या त्रिवेंद्रम इथल्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग त्रिवेंद्रम इथली ही घटना आहे. CET जवळचा बसस्टॉप हा तिरुअनंपुरममधल्या तरुणाईचा भेटण्याचा, गप्पा मारण्याचा आवडता स्पॉट आहे. तरुणाई असल्याने अर्थातच इथं कायम हास्यविनोद, दंगामस्ती होत असते. पण नेमकी हीच गोष्ट इथल्या काही रहिवाशांच्या डोळ्यांत खुपत होती. या तरुणांना त्यावरून या रहिवाशांचे टोमणेही ऐकायला लागले आहेत. या तरुणांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र मुलं-मुली एकत्र बोलण्यानं आजच्या आधुनिक समाजातही किती अस्वस्थता असू शकते, याचं उदाहरण या मुलांना बघायला मिळालं आणि त्यानं त्यांना धक्काच बसला. या बसस्टॉपवर एक लांब स्टीलचा बाक होता. पण मुलंमुली एकत्र बसू नयेत यासाठी कुणीतरी बुधवारी हा लांबलचक स्टीलचा बेंच चक्क कापला आणि त्याचे तीन छोटे-छोटे भाग केले. ही तीन सीट्स अशासाठी केली होती की, त्यावर एकावेळेस एकच जण बसू शकेल. अर्थातच हे बघितल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.याला उत्तर द्यायचं या तरुणांनी ठरवलं. पण तेही अगदी वेगळ्या मार्गाने. इथं जमणाऱ्या मुलामुलींनी त्याच छोट्या बेंचवर एकत्र बसून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमध्ये मुली मुलांच्या मांडीवर बसलेल्या आहेत आणि त्यांनी एकमेकांना धरलं आहे. ‘हे सीट ऑन लॅप’ आंदोलन केरळमध्ये आणि सोशल मीडियावर चांगलंच चर्चेचा विषय ठरलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालं आणि त्यामागचं कारणही व्हायरल झालं. हे असं उत्तर दिल्याबद्दल या मुलांचं अनेकांनी कौतुक केलं आहे. “आजही लोक असा विचार करतात हे बघून आम्हाला धक्का बसला,” असं कॉलेजच्या युनियनचा अध्यक्ष अजमल लबेब यानं इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिरुअनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन यांनीही हा फोटो पाहिला आणि त्यांनी या बसस्टॉपला गुरुवारी भेटही दिली. इतकंच नाही तर या ठिकाणी लिंगभेद नसणारा असा सर्वांसाठीचा बसस्टॉप वाय-फाय सुविधेसह लवकरच बसवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. “या बसची शेड ही इथल्या स्थानिक रहिवाशांच्या संघटनेकडून उभारण्यात आली होती. आम्ही इथं खूप वेळ एकत्र घालवायचो; पण मुलंमुली एकत्र हसतायेत, गप्पा मारत आहेत हे इथल्या काही रहिवाशांना आवडलं नाही. एकदोनदा आमच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंटही केल्या गेल्या. आम्ही इथं रात्री का गप्पा मारतो, असं पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं ”, असं लबेबनं सांगितलं. (हे वाचा:VIDEO :
‘काय तो पाऊस, काय ते खड्डे, केडीएमसी ओकेमध्ये’, कल्याणच्या तरुणाचा Video Viral
) या सीट्सचे असे तीन तुकडे केलेले बघितल्यावर सगळेचजण चिडले होते, असं कॉलेजच्या युनियनचा सदस्य अभिजीत व्ही. व्ही. यानं सांगितलं. “जेव्हा महापौरांनी याबद्दल इथल्या स्थानिक रहिवासी संघटनेकडे चौकशी केली, तेव्हा सोशल डिस्टन्सिंगसाठी असं केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र महापौरांनी सर्वांसाठी एक बसस्टॉप इथं लवकरच उभारण्यात येईल असं आश्वासन आम्हाला दिलं. इथं मुलंमुली एकत्रितपणे बसू शकतील. इथल्या स्थानिकांकडून इथं उभं राहणाऱ्या तरूणांवर सतत लक्ष ठेवलं जातं, मॉरल पोलिसिंग केलं जातं,” असंही अभिजीतनं सांगितलं.या विद्यार्थ्यांना महापौर राजेंद्रन यांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर मल्याळम भाषेत पोस्टही लिहिली आहे. “CET जवळचा बसस्टॉपचं सीट तीन तुकड्यांमध्ये कापणं हे प्रगत समाजासाठी अत्यंत घातक आहे. देशभरात कुठेही मुलंमुली एकत्र बसण्यावर बंदी नाही. मुलामुलींनी एकत्र बसणं चांगलं नाही, असं ज्यांना वाटत असेल ते अजूनही बैलगाडीच्या काळात म्हणजे जुन्या बुरसटलेल्या समाजात राहतात. अशाप्रकारे या नैतिक पोलिसिंगविरुद्ध ठामपणे उभं राहिल्याबद्दल आणि त्याचा निषेध केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे अभिनंदन,”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. **(हे वाचा:**
नाक आहे की चोच! नाकाचा उपयोग करून 53 वर्षांच्या व्यक्तीचा अनोखा विक्रम, पाहा Video
) तर केरळच्या शिक्षणमंत्री व्ही. शिवानकुट्टी यांनीही फेसबुकवरून या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. मुलंमुली एकत्र शिकत असतील, एकत्र वेळ घालवत असतील, त्यांच्यात चांगली मैत्री असेल तर समाज निकोप होतो. मुलींकडे बघण्याचा नवा पिढीचा दृष्टिकोन अधिक समान होत असताना अशाप्रकारे जर त्यात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे. या मुलांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शांततेत या स्वयंघोषित नैतिक पोलिसांना वठणीवर आणलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.