मुंबई, 1 फेब्रुवारी : नागालँडच्या उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग हे अविवाहित असल्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. आता त्यांनी त्यांच्या अविवाहित असण्यासाठी स्वतःलाच कारणीभूत ठरवले आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटला 'शादी डॉट कॉम' आणि त्या कंपनीच्या संस्थापकांनी उत्तर दिलं असून याची सध्या बरीच चर्चा रंगली आहे.
42 वर्षांचे तेमजेन इम्ना अलोंग अविवाहित आहेत. सध्या ते नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी विकास मंत्री आहेत. सोमवारी 30 जानेवारी रोजी त्यांनी स्वतःचा एक फोटो ट्वीट केला. त्यात ते एका थिएटरमधल्या अत्यंत आरामदायी सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या शेजारी कोणीही बसलेलं दिसत नाहीये.
हे ही वाचा : त्या खेळाडूविना भारतात पोहोचली कांगारुंची टीम, 'या' कारणाने चुकली फ्लाईट
हा फोटो ट्विट करताना अलोंग यांनी शादी डॉट कॉम या ऑनलाइन वेडिंग सर्व्हिसचे संस्थापक अनुपम मित्तल यांनाही टॅग केलंय. या ट्विटमध्ये अलोंग यांनी लिहिलं आहे, की 'अंदाज लावा बरं, सोफा मला रिलॅक्स करतोय की मी सोफ्याला? माझ्यासोबतची सीट रिकामी दिसतेय. कारण मी अनुपम मित्तलजींची ऑफर अद्याप स्वीकारली नाही. बाय द वे, मी 'अवतार' हा सिनेमा पाहतोय.' या ट्विटमध्ये त्यांनी मजेशीर इमोजीचाही वापर केला आहे.
हे ही वाचा : 'मी कधीच त्यांना...', विराट कोहलीने लता दीदींविषयी व्यक्त केली खंत
अलोंग यांच्या गमतीशीर ट्विटला शादी डॉट कॉमच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर उत्तर देण्यात आलंय. त्यात शादी डॉट कॉमने म्हटलं, 'मदत करायला आनंद वाटेल. मग ती खूप दूर असणार नाही.' शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल यांनीही ट्विटरवरच्या या संभाषणात भाग घेतलाय. त्यांनी लिहिलंय, 'ऑफर अद्यापही खुली आहे.'
मित्तल यांच्या या उत्तराचा संदर्भ जुलै 2022 मध्ये आहे. शादी डॉट कॉमतर्फे पुरवल्या जाणाऱ्या मॅचमेकिंग सेवेचा वापर करण्याची ऑफर अनुपम मित्तल यांनी अलोंग यांना दिली होती. मात्र तेव्हा अलोंग यांनी ती ऑफर नाकारली. तेव्हा ते म्हणाले होते, की 57 वर्षांच्या सलमान खानचं लग्न आधी होण्याची ते वाट पाहत आहेत. आपली सिंगलच राहण्याची इच्छा अलोंग यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी जागतिक लोकसंख्या दिनी त्यांनी नागरिकांना 'सिंगल मूव्हमेंट' मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.