मुंबई, 1 फेब्रुवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याचे चाहते जगभरात आहेत. विराट सध्या उत्तम फॉर्मात असून त्याने काही दिवसांपूर्वीच श्रीलंके विरुद्ध 74 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते. सध्या विराट कोहली हा न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचा भाग नसला, तरी तो 9 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसत आहे. यापूर्वी विराटने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या विषयी खंत व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली ची एक हलकी फुलकी मुलाखत घेण्यात आली. यात विराटला त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी विषयी तसेच क्रिकेट विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात विराटसाठी एक प्रश्न होता की तुला एखाद्या ऐतिहासिक महिलेसोबत डिनर करण्याची संधी मिळाली असती तर तू कोणासोबत डिनर केला असतास? यावर विराटने गायिका लता मंगेशकर यांचे नाव घेतले.
विराट म्हणाला, “मला लताजींना भेटण्याची कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडलं असतं, त्यांच्या आयुष्याबाबत आणि त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा होती”. विराटच्या या उत्तराने सर्वांच्याच हृदयाला स्पर्श केला.
Straight from the heart. #ad @StayWrogn pic.twitter.com/FK6cojs7by
— Virat Kohli (@imVkohli) January 31, 2023
भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेआधी मंगळवारी पत्नी अनुष्का सोबत ऋषिकेश येथील स्वामी दयानंद सरस्वती महाराज यांच्या समाधी स्थाळाला भेट दिली.