मुंबई, 02 फेब्रुवारी :सोशल मीडियावर वन्य आणि पाळीव प्राण्यांचे फोटो, व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात. या फोटो, व्हिडिओजना नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळते. अलीकडच्या काळात कॅमेरा अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. मोबाइलमध्ये दर्जेदार कॅमेरा असल्याने फोटो किंवा व्हिडिओची हौस प्रत्येकजण पूर्ण करताना दिसतो. सोशल मीडियामुळे कॅमेरा वापराकडे निश्चितच कल वाढला आहे. कॅमेरामुळे साता समुद्रापार असलेल्या गोष्टी अगदी जवळ आल्या आहेत. अशा कॅमेरानं एखाद्या वन्य प्राण्याला भुरळ घातली तर? हे कसं शक्य आहे, अशी प्रतिक्रिया तुम्ही या प्रश्नावर द्याल; पण एका अस्वलाला कॅमेराची भुरळ पडली. जंगलात टेहळणीसाठी लावलेला कॅमेरा एका अस्वलाच्या हाती लागला. त्याने त्या कॅमेऱ्याच्या साह्याने एक-दोन नाही, तर 400 सेल्फी काढले आहेत. सध्या त्याचे खास पोजमधले सेल्फी इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. `नवभारत टाइम्स`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
कॅमेराशिवाय जीवनात मजा नाही, असा समज अलीकडे दृढ झाला आहे. कारण कॅमेराच्या मदतीने आठवणी ताज्या ठेवता येतात. कॅमेरामुळे सर्वच गोष्टी जवळ आल्याचं जाणवतं. कॅमेराच्या मदतीने अनेक जण आपलं टॅलेंट जगासमोर आणतात. सेलेब्रिटी होण्यासाठी कॅमेरा महत्त्वपूर्ण माध्यम ठरत आहे. सध्या एका अस्वलाचे सेल्फी इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. जंगलात निरीक्षणासाठी ठेवलेला कॅमेरा एका अस्वलाच्या हाती लागला. या कॅमेराद्वारे त्याने केवळ एक-दोन नाही, तर 400 सेल्फी काढले आहेत. हे फोटो नोव्हेंबर 2022मधले असल्याचं सांगितलं जात आहे. या अस्वलाला पोज देण्याचा छंद होता, असं हे सेल्फी पाहिल्यावर लक्षात येतं. कारण त्याने स्वतःचे वेगवेगळ्या अँगलने सुंदर फोटो काढले आहेत.
हेही वाचा - जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा: 655 कोटींचा मालक, लाइफस्टाइल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही
अस्वलाचे काही ब्लॅक अँड व्हाइट सेल्फी `बोल्डर ओपन स्पेस` आणि `माउंटन पार्क्स`ने 24 जानेवारीला ट्विटरवरून शेअर केले आहेत. या ट्विटला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून, दोन हजारांहून अधिक युझर्सनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. या पोस्टवर शेकडो युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. यात काही युझर्सनी `अस्वल तर खूप स्मार्ट आहे,` अशी कमेंट केली आहे. अस्वलाचे फोटो पाहून काही युझर्सनी `हे लाजाळू वाटत नाही,` अशाही कमेंट्स केल्या आहेत. `हे अस्वल तर सेल्फीबाज निघालं,` असं काही युझर्सनी म्हटलं आहे. काही युझर्सनी `पोज द्यायला कुठे शिकलास` असा प्रश्नदेखील कमेंटमधून विचारला आहे.
`बोल्डर ओपन स्पेस` आणि `माउंटन पार्क्स`ने ही अस्वलाच्या सेल्फीची पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे, की नुकताच एका अस्वलाने एक वाइल्ड लाइफ कॅमेरा शोधून काढला आहे. या कॅमेराचा वापर आम्ही जंगलात निरीक्षणासाठी करतो. या कॅमेराद्वारे अस्वलाने एकूण 580 फोटो काढले. त्यात 400 सेल्फी या अस्वलाचे होते. सध्या इंटरनेटवर हे सेल्फी जोरदार चर्चेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PHOTOS VIRAL