पाटणा, 02 डिसेंबर : शाळा असो वा ऑफिस सुट्टी हवी म्हणून तुम्ही तशी काही ना काही कारणं दिली असतील. काही वेळा गावाला जायचं आहे, कुठे फिरायला जायचं किंवा एका ठराविक कामासाठी सुट्टी हवी असेल तर आपण त्यासाठी आधीच अर्ज करतो. पण काही सुट्ट्या अशा असतात ज्या आपल्याला अचानक घ्यावा लागतात. म्हणजे कधी आपण आजारी पडतो, कुणाचा मृत्यू होतो. आता हे काही सांगून घडत नाही. अशावेळी अचानक रजा घ्यावी लागते. पण तुम्हाला फक्त वाचूनच धक्का बसेल की एका शाळेतील शिक्षकांवर शाळेत सुट्टीसाठी जिवंत आईला मारण्याची वेळ ओढावली आहे.
एका शाळेतील शिक्षकांचे सुट्टीसाठीचे अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका अर्जामध्ये शिक्षकाने चक्क आपल्या आईच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे. शिक्षकाने आपल्या हातानेच आपल्या आईचा मृत्यू लिहिला आहे. या अर्जाने विशेष लक्ष वेधलं आहे.
अर्जात म्हटलं आहे, "5 डिसेंबर, 2022 रोजी रात्री 8 वाजता माझ्या आईचा मृत्यू होणार आहे, तिच्या अंत्यसंस्कारासाठी 6 आणि 7 डिसेंबर मी शाळेत अनुपस्थित राहणार आहे. कृपया माझा अर्ज स्वीकार करावा"
हे वाचा - उंदरांचा इतका उच्छाद की सरकारही वैतागलं; बंदोबस्त करणाऱ्याला एक कोटी रुपयांची ऑफर
आता आपल्या जिवंत असलेल्या आईला अशा पद्धतीने मारण्याची वेळ शिक्षकाव का ओढावली, शिक्षकाने ही अशी भविष्यवाणी का केली, हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षकाने सुट्टीसाठी असा अर्ज करण्यामागे एक कारण आहे.
बिहारमधील सरकारी शाळेतील शिक्षकाचा हा अर्ज आहे. इथल्या सरकारी शाळेसाठी अजब फर्मान काढण्यात आला आहे. कॅज्युअल लिव्हसाठी तीन दिवस आधी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंगेर, भागलपूर आणि बांकातील शाळेत असे आदेश जारी करण्यात आले आहेत. शिक्षकांची कमी संख्या पाहता हे आदेश जारी केल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.
आरडीडीई आणि डीईओच्या या विचित्र आदेशानंतर शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याचाच परिणाम म्हणजे हे अनोखे अर्ज. ज्यात एका शिक्षकाने आपल्या आईच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे. तर कुणी आपण आजारी पडणार आहोत, असं सांगत सुट्टी मागितली आहे. आकस्मिक सुट्टी आधी कळवण्याच्या सरकारच्या आदेशाचा विरोध म्हणून असे प्रतीकात्मक अर्ज करण्यात आले आहेत. शिक्षकांनी असे अर्ज पाठवून या आदेशाला विरोध केला आहे. हे आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Viral, Viral videos