हैदराबाद, 14 जानेवारी : रस्त्याने जाताना मोकाट कुत्र्यांची भीती तर असतेच, पण बरेच पाळीव कुत्रेही हिंस्त्र असतात. काही कुत्रे तर अनोळखी माणसं दिसली, की थेट अंगावर धावतात. त्यामुळे अनेकांना कुत्र्यांची भीती वाटते. अशाच भीतीपोटी एका तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली आहे. याबद्दलचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.
हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आणि तो पाठी लागल्यामुळे घाबरलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. मोहम्मद रिझवान असं जखमी तरुणाचं नाव आहे. 23 वर्षांचा रिझवान स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी बॉय आहे. तो बंजारा हिल्समधल्या एका अपार्टमेंटमध्ये पार्सल देण्यासाठी गेला होता, तेव्हा ही घटना घडली.
हे ही वाचा : संतापलेल्या हत्तीचा रस्त्यावरच धिंगाणा; पाठलाग करत सोंडेनं उचलली कार अन्.., Shocking Video
रिझवानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिझवान तिसऱ्या मजल्यावर फूड पार्सल डिलिव्हर करण्यासाठी गेला होता. शोभना नावाच्या महिलेने ती ऑर्डर केली होती. तिच्या घराचा दरवाजा उघडताच तिचा 11 वर्षं वयाचा जर्मन शेफर्ड कुत्रा भुंकू लागला आणि त्याच्या अंगावर आला. त्यामुळे घाबरून रिझवान धावू लागला. कुत्राही त्याचा पाठलाग करू लागला. अखेर पुढे कुठेच जायला जागा न मिळाल्याने रिझवानने थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
रिझवानने खाली उडी घेताच पार्सल मागवणारी शोभना खाली धावत आली आणि तिला रिझवान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर तिने त्याला निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो अद्याप अतिदक्षता विभागामध्ये आहे.
युसूफगुडा परिसरातील श्रीराम नगरमध्ये राहणाऱ्या रिझवानची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रिझवानचा भाऊ मोहम्मद खाजा याने गुरुवारी रात्री (12 जानेवारी) बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. रिझवानवर सध्या उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने त्याच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.
हे ही वाचा : कुत्र्याने मालकासोबत दोरीच्या उड्या मारून केला विश्वविक्रम, थेट गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं नाव
शोभनावर गुन्हा दाखल
रिझवान गेल्या तीन वर्षांपासून डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत आहे. त्याच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुत्र्याची मालकीण शोभना हिच्याविरुद्ध आयपीसी कलम 336 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणं) आणि 289 (प्राण्यांबाबत निष्काळजीपणा) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Hyderabad, Owner of dog, Viral