मुंबई 21 जुलै: अनेकदा आपण भिकारी व्यक्तीकडे लाखो रुपये सापडल्याच्या किंवा बँकेत त्या व्यक्तीच्या नावावर लाखो रुपये असल्याच्या बातम्या वाचतो, तेव्हा थक्क व्हायला होतं. अशीच एक आश्चर्याचा धक्का देणारी घटना नुकतीच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) इथं उघडकीस आली आहे. इथल्या सोटीगंज (Sotiganj) भागातील एका भंगारवाल्याकडं कोट्यवधीची संपत्ती असल्याचं उघड झालं असून, त्याचं अलिशान घर बघून पोलिसही अचंबित झाले आहेत. या कोट्याधीश भंगारवाल्याचं नाव मन्नू उर्फ मोईनुद्दीन कबाडी (Mannu Kabadi) असं आहे. दोन महिने पोलिस त्याची बेहिशेबी संपत्ती धुंडाळून जप्त करण्याची कारवाई करत होते. आतापर्यंत पोलिसांनी त्याची तब्बल 1.10 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून, त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
मुंडाली परिसरातील कुंडला गावात त्याच्या घरावर पोलीसांनी नुकताच छापा टाकला तेव्हा ते अलिशान घर बघून पोलिसही थक्क झाले. मन्नूची आवडनिवड एखाद्या कोट्यधीश व्यक्तीला लाजवेल अशी असल्याचं या घरातील सुखसोयींवरून दिसून येतं. तीन हजार चौरस फुट जागेवर हे घर आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट उंची आणि ब्रँडेड आहे. बाथरूममधील फिटींग्जदेखील अत्यंत महागड्या ब्रँडसची असून या घराच्या अंतर्गत सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचं सहज लक्षात येतं.
King Cobra ने दुसऱ्या कोब्राला केलं फस्त, Viral होतोय हा भीतीदायक Photo
अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार एवढंच नव्हे तर या मन्नू कबाडीची शहरात अशी आणखी तीन घरं आहेत. त्याचं दुसरं घर सोटीगंजमध्ये आहे. त्या घरातही लाखो रुपये खर्च करून सजावट करण्यात आली आहे. या तीन घरांशिवाय मन्नू कबाडीकडे काही जमिनीही आहेत. तसंच त्याच्याकडे 22 बस असून त्या करारावर वापरण्यास देण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य वाहनंही आहेत. पोलीसांनी जप्त केलेल्या 1.10 कोटी रुपयांच्या मालमत्तेत सुमारे 95 लाख रुपये किमतीच्या जमिनी, 10 लाख रुपयांच्या कंत्राटी बस, दुचाकी, स्कूटी आदींचा समावेश आहे.
पती व्हेंटिलेटरवर, दुसरीकडे पत्नीने मातृत्व सुखासाठी कोर्टात दाखल केली याचिका; न्यायाधीश हैराण
मन्नू कबाडी म्हणजे भंगार विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या माणसाकडे एवढी संपत्ती आली कशी असा प्रश्न पडला असेल नां? मन्नू कबाडीनं ही संपत्ती मिळवली ती वाहन चोरीच्या व्यवसायातून. भंगार आणि दुधाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली वाहन चोरी करून तिची रंगरंगोटी करून विकण्याचा त्याचा उद्योग होता.
सोटीगंज परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्यानंतर भाजप खासदार(BJP MP) राजेंद्र अग्रवाल यांनी त्याची दखल घेत वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांना पत्र लिहून इथल्या अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांची यादीच पाठवली. त्यामुळं अनेक पोलिसांचे अशा व्यावसायिकांशी असणारे लागेबांधे उघड झाले आणि एकच खळबळ माजली. अग्रवाल यांनी पोलिस कारवाई करत नसल्याचा मुद्दा संसदेतही उपस्थित केला. अखेर सदर बझार पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसएचओ दिनेश चंद यांनी मन्नू कबडीला अटक करून तुरूंगात पाठविले. तेव्हापासून मन्नू तुरूंगात आहे.
दरम्यान, एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी संशयित पोलिसांवर कारवाई केली आणि त्यानंतर मन्नू कबाडी आणि अन्य व्यावसायिकांच्या चौकशीला वेग आला. त्यातून पोलीसांनी अनेक ठिकाणी छापे घालून मन्नू कबाडीची कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त केली. आता पोलिस मन्नू कबाडीसारख्या अन्य व्यावसायिकांवर कारवाई करत असून त्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.