वॉशिंग्टन, 22 जानेवारी : स्मॉल, मीडियम आणि लार्ज आकारातला पिझ्झा सर्वांनाच माहीत आहे, पण एखाद्या हेलिपॅड किंवा त्यापेक्षाही मोठ्या आकारातला पिझ्झा कधी पाहिलाय का? पिझ्झा हट या पिझ्झा तयार करणाऱ्या कंपनीने जगातला सर्वात मोठा असा पिझ्झा तयार केला आहे. ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. तब्बल 13,990 चौरस फूट इतक्या मोठ्या आकाराचा हा पिझ्झा तयार करण्यात आला. पिझ्झा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हा पदार्थ जगातल्या बहुतेक देशांमध्ये आवडीनं खाल्ला जातो. पिझ्झा बनवणाऱ्या काही कंपन्यांमध्ये पिझ्झा हट ही एक लोकप्रिय कंपनी आहे. त्यांची ही फूड चेन भारतासह अनेक देशांमध्ये आहे. नुकताच त्यांनी एक जगावेगळा विक्रम केला. सीएनएनच्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस कनव्हेंशन सेंटर इथल्या भल्या मोठ्या सभागृहात हा भव्य पिझ्झा तयार करण्यात आला. 13990 चौरस फूट आकाराचा हा पिझ्झा तयार करण्यासाठी 13653 पाउंड पिठाचा गोळा, 8 हजार पाउंडपेक्षा जास्त चीज, 4948 पाउंड मरिनारा सॉस आणि पेपरोनीचे 6,30,496 तुकडे वापरण्यात आले. हे वाचा - बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य हा पिझ्झा तयार करण्यासाठी पिझ्झा हटनं कंपनीतल्या कुशल कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली होती. त्यांनी फरशीवर पिझ्झाच्या पिठाचे तुकडे व्यवस्थित जोडले. त्यानंतर त्यावर मरिनारा सॉस, पेपरोनी आणि चीज पसरलं. हा इतका मोठा पिझ्झा बेक करण्यासाठी त्यांनी फिरत्या बेकिंग मशीनचा वापर केला. त्याद्वारे पिझ्झाच्या प्रत्येक भागाला काळजीपूर्वक बेक करण्यात आलं. तयार झालेल्या या मोठ्या पिझ्झाचे तब्बल 68 हजार तुकडे झाले, असं पिझ्झा हटचे अध्यक्ष डेव्हिड ग्रेव्हज यांनी सांगितलं.
पिझ्झा हटच्या ‘द बिग न्यू यॉर्कर’ या नव्वदच्या दशकातल्या लोकप्रिय डिशचा सन्मान करण्यासाठी हा पिझ्झा तयार करण्यात आला. ती लोकप्रिय डिश गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. मात्र लोकांच्या आग्रहामुळे ती पुन्हा मेन्यूमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 1 फेब्रुवारीपासून ती पुन्हा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 18 जानेवारीला सर्वांत मोठा पिझ्झा तयार करण्यात आला. ती डिश पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला काही भव्य करायचं होते, त्यासाठी हा पिझ्झा तयार केल्याचं पिझ्झा हटच्या अध्यक्षांनी म्हटलंय. हे वाचा - जगातील सर्वात खतरनाक झाड! स्पर्श करताच जीव नकोसा होईल; चुकूनही हात लावू नका हा विक्रम करण्यासाठी युट्यूबर Eric ‘Airrack’ Decker याचीही मदत घेण्यात आली. त्यानंही यावेळी 10 मिलियन सबस्क्रायबर्सची नोंद पूर्ण केली. हा तयार पिझ्झा वाया जाऊ नये यासाठी तो गरजूंना देण्यात आला. लॉस एंजेलिस भागातल्या स्थानिक फूड चेन्स आणि संस्थांना तो दिला गेला.
जगातला सर्वांत मोठा पिझ्झा तयार करण्याचा पहिला विक्रम 2012मध्ये इटालियन खानसाम्यांनी केला होता. त्यांनी 1261.65 चौरस मीटर इतका मोठा पिझ्झा तयार केला होता.