मुंबई 18 मार्च : महिला असो की पुरुष, प्रत्येकजण आपल्या केसांबाबत खूप जागरूक असतो. केसांना सिल्की, स्मूथ आणि निरोगी बनवण्यासाठी लोक अनेक निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काहीजण कांद्याच्या रसात किंवा खोबरेल तेलात लिंबू घालतात तर काही केसांना अंडी लावतात. बरेच लोक शॅम्पू बदलत राहतात आणि काहीजण केसांच्या वाढीसाठी औषधेदेखील खातात. पण तुम्ही कधी कोणाला शॅम्पू किंवा साबणाऐवजी कोका कोलाने केस धुताना पाहिलं आहे का? नक्कीच तुम्ही हे पाहिलं नसेल. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विचित्र ट्रेंड सुरू आहे, ज्यात असं केलं जात आहे. ‘ब्रेकअप के बाद’ व्हाल मालामाल; तुम्ही तुमचं Heartbreak Insurance काढलंय का? टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, केस धुण्याचा एक अतिशय विचित्र प्रकार सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, परंतु आपण यापूर्वी याबद्दल क्वचितच ऐकलं असेल. या ट्रेंड अंतर्गत लोक कोका कोलाने केस धुत आहेत. ज्या लोकांना कोका कोला खूप आवडतं, ते हे हॅक कधीच स्वीकारणार नाहीत किंवा त्यांच्या आवडत्या कोल्ड्रिंकचा एक थेंबही वाया घालवणार नाहीत. मात्र केसांची निगा राखण्यासाठी आणि त्यांना सुंदर करण्यासाठी काही लोक त्यांचं मत बदलूही शकतात. या पद्धतीबद्दल सांगण्यापूर्वी, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हा एक व्हायरल हॅक आहे. यामुळे News18 त्याच्या अचूकतेची पुष्टी करत नाही. असं कोणतंही हॅक करण्यापूर्वी, आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
कोका कोलाने केस धुण्याचा सल्ला का दिला जात आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. कोका कोला आणि इतर प्रकारच्या एरिएटेड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते. त्यात पीएच पातळीचं प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे त्वचेचे क्युटिकल्स कडक होतात आणि केस गुळगुळीत आणि चमकदार होतात. यासोबतच कोका-कोला केसांना वेव्ही लुक देण्यास मदत करते. हॅकमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की केस आधी कोका-कोलाने धुऊन नंतर पाण्याने धुतले तर अधिक बाउन्सी होतात. कोका कोलामध्ये साखर देखील असते ज्यामुळे केसांची घनता देखील वाढते. आता प्रश्न असा पडतो की व्हायरल हॅकमध्ये कोका-कोला वापरण्याची काय पद्धत सांगितली गेली आहे. तर, केसांवर कोका कोला टाका आणि केस चांगलं धुवून घ्या. यानंतर 10-15 मिनिटे केस असेच राहू द्या आणि नंतर कोका कोला पाण्याने धुवा, असं यात सांगण्यात आलं आहे.