नवी दिल्ली 05 मे : अनेकदा विमानात अशा काही घटना घडतात, ज्या चर्चेचा विषय बनतात. भारतात गेल्या काही दिवसांत प्रवाशांनी मद्यधुंद अवस्थेत फ्लाईटमध्ये गोंधळ घातलच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना टेक्सासमध्ये यूनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्येही घडली, ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. वृत्तानुसार, कोडी बेंजामिन लोविन्स नावाच्या प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट गेटमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. असं करण्याआधी या प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटला धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरण असं होतं की त्याला आणि त्याच्या पत्नीला त्यांना मिळालेल्या सीटवरुन उठवून दुसऱ्या जागेवर जाण्यास सांगण्यात आलं होतं.
तिथे उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेची माहिती देताना सांगितलं की, आपल्या पत्नीला ठरलेल्या सीटपासून दूर जाण्यास सांगितल्यानंतर लोविन्स नाराज झाला. तिथे उपस्थित असलेल्या फ्लाइट अटेंडंटने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोविन्सला राग अनावर झाला आणि त्याने फ्लाइट अटेंडंटला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेचच प्रवाशाने इमर्जन्सी एक्झिटच्या दिशेने धाव घेतली आणि गेटही उघडलं. मात्र, फ्लाइट अटेंडंट आणि प्रवाशांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला सुखरूप परत आणलं.
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पोस्टवर येत आहेत. काहींनी फ्लाइटमध्ये अशा घटनांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. त्याच वेळी, असे बरेच वापरकर्ते आहेत ज्यांनी लोविन्सवर त्याच्या कृतीबद्दल जोरदार टीका केली आहे आणि इतर प्रवाशांचे जीवन धोक्यात आणल्याचा ठपकाही ठेवला आहे. युनायटेड एअरलाइन्सनेही या घटनेवर आपली बाजू मांडली आहे आणि हे अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर एअरलाइन्सने त्यांच्या एअरलाइन्समध्ये लोविन्सच्या प्रवेशावर कायमची बंदी घातली आहे.