मुंबई, 3 ऑक्टोबर : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. अगदी भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ती धावत असते. लाखो मुंबईकर यामधून प्रवास करत आपल्या कामाचं ठिकाण गाठतात. बदलापूर-कर्जत किंवा वसई- विरार, यासारख्या लांबच्या उपनगरातून मुंबईकर रोजचे काही तास लोकलनं प्रवास करतात. लोकलचा रोजचा प्रवास आनंदाचा जावा यासाठी प्रवाशांचे काही ग्रुप लोकलमध्ये अभंग, भजनं गातात. रोज सकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करणारे प्रवासी मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. 1998 साली मुंबई लोकलच्या पहिल्या भजनी मंडळाचं रजिस्ट्रेशन झाले. सध्या मुंबईत 250 पेक्षा जास्त लोकल भजनी मंडळ आहेत. यामधील अविनाश आंब्रे हा तरूण गायक सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. ‘लोकल 18’ च्या प्रतिनिधिनी अविनाश आंब्रे यांना गाठलं आणि त्यांचा ‘सुरेल प्रवास’ जाणून घेतला. दहा वर्षांची परंपरा अविनाश यांना गायनाची आवड असल्यामुळे त्यांनी 2012 पासून लोकल ट्रेन मध्ये भजनं गायला सुरुवात केली. मध्य रेल्वेने सकाळी कामावर जात असताना प्रवास आनंदी व्हावा हा त्यामागील उद्देश होता. अविनाश यांच्या या प्रयत्नांना हळूहळू इतरांचीही साथ मिळाली. त्यामधून त्यांचा 20-25 जणांचा ग्रृप तयार झाला. या ग्रुपमधील कुणी मृदंग आणला तर कुणी काँगो. अविनाश यांच्या आवाजाला या वाद्यांची साथ मिळाली. त्याचे अनेकांनी कौतुक केले. डोंबिवलीहून सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या दिवसाची सुरूवात अविनाश यांच्या गोड आवाजाने होते.
डोंबिवली ते विक्रोळी असा अविनाश यांचा प्रवास असतो. मला लहानपणापासून आई बाबांनी भजनाची सवय लावली होती. ‘मी भीमसेन जोशी यांची भजनं ऐकायचो आणि त्यातून मी शिकलो. मला नोकरी लागली तेव्हापासून आजपर्यंत मी लोकलमध्ये नियमित हरिनामाचा गजर करत आहे. सुरूवातीला लोकांना त्रास होत असे. पण, आम्ही त्यांचे गैरसमज दूर केले. त्यांना आमचा उद्देश सांगितला. त्यानंतर काही प्रवाशी देखील आमच्यासोबत भजन म्हणायला लागली,’ असे अविनाश यांनी सांगितले. लोकलमधील अनेक जण छान गातात. पण ते कॅमेऱ्यासमोर गाऊ शकत नसल्यानं त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत. त्यांना भविष्यात मदत करणार असल्याचं अविनाश यांनी सांगितलं. माझ्यामुळे इतर व्यक्ती पुढं येणार असतील तर मी नक्की मदत करेन असे अविनाश यांनी स्पष्ट केले. हा गरबा पाहिला नाही तर तुम्ही काहीच पाहिलं नाही; नवरात्रीत तुफान व्हायरल होतोय VIDEO कोणत्या लोकलमध्ये रंगतात अविनाश यांची भजनं? कल्याण येथून 7:09 वाजता सुटणारी परळ धिमी लोकल, 7:18 वाजता डोंबिवली येथून सूटते. या लोकलमध्ये अविनाश अंबरे आणि त्यांचे सहकारी भजनं करतात. अविनाश हे विक्रोळी ला उतरतात मात्र त्यांचे सहकारी थेट परळ पर्यंत ही भजनं सुरु ठेवतात.