सागर, 5 नोव्हेंबर : घरात साप दिसला तरी लोक भीतीनं तिथून निघून जातात. सापाला हातानं पकडून बाहेर फेकण्याचं धाडस सहसा कोणी दाखवत नाही. अनेकदा साप पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावलं जातं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक महाकाय अजगराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक अजगराची पूजा करताना दिसत आहेत. अॅनाकोंडापेक्षा हा अजगर मोठा आहे, असा दावाही करण्यात येतोय. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिलंय.
मध्य प्रदेशातील सागर येथील बागराज मंदिरातील एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये स्थानिक लोक अजगराची पूजा करताना दिसत आहेत. स्थानिक लोकांचा दावा आहे की, हा अजगर अॅनाकोंडापेक्षा मोठा आहे, आणि तो अनेक दशकांपासून मंदिराच्या गुहेत राहतो.’ हा अजगर अधूनमधून दिसतो, आणि जेव्हा तो दिसतो, तेव्हा मंदिरात येणारे लोक मंत्रांचं पठण करू लागतात. ‘अजगर दादा’ या नावानं सुद्धा या अजगराला ओळखलं जातं.
दोन दिवसांपूर्वी हा अजगर मंदिर परिसराच्या गुहेत दिसला होता. त्याचवेळी लोकांनी त्याचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. तेव्हापासून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या अजगराला लोक घाबरत नाहीत. उलट अजगरासमोर लोक हरसिद्धी मातेची पूजा करतानाही दिसतात. हा अजगर 40 फुटांपेक्षा जास्त लांबीचा असल्याचा दावा केला जातोय.
वाचा - फिशचा शौकिन सचिन गोव्यात जाऊन बटाट्याची भाजी अन् चवळीचा झाला फॅन
याबाबत मंदिरातील पुजारी पुष्पेंद्र महाराज यांनी सांगितलं की, ‘अजगर दादा अजिबात रागवत नाहीत. ते मंदिराचे तारणहार आहेत, आणि अनेक दशकांपासून आम्ही त्यांची पूजा करत आहोत. मंदिर परिसरात कधीकधी 10 फूट लांब कोब्राही दिसतो. पण मंदिरात परिसरात दिसणाऱ्या कोणत्याही सापांनी आतापर्यंत मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना इजा केली नाही, असा दावाही पुष्पेंद्र महाराज यांनी केलाय.
दुसरीकडे एका वृद्धानं सांगितलं की, ‘आजपर्यंत कोणीही अजगर पूर्णपणे पाहिलेला नाही. लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. लोक या अजगराला ऋषींचा पुनर्जन्म मानतात.’
दरम्यान, अजगराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. एकीकडे केवळ सापाचं नाव ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. मात्र, महाकाय अजगर समोर असतानाही त्याची पूजा करताना लोक दिसत असल्यामुळे हा व्हिडिओ जास्त चर्चेत आला आहे. पण या अजगराची लांबी नेमकी किती आहे, हे अद्याप समोर आलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python, Python snake