भोपाळ, 18 ऑक्टोबर : आई ओरडली, आईने मारलं किंवा आईने काही दिलं नाही तर सामान्यपणे मुलं आपल्या वडिलांकडे, आजी-आजोबांकडे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडे तक्रार करतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अवघ्या 3 वर्षांचा चिमुकला आईविरोधात तक्रार करण्यासाठी थेट पोलिसात पोहोचला. पोलीस ठाण्यात आईविरोधात तक्रार करायला गेलेल्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पोलीस ठाण्यात तुम्ही मोठ्या माणसांना चोरी, मारहाण अशी तक्रार देताना पाहिलं असेल. पण अवघ्या तीन वर्षांचा हा मुलगाही पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या आईने असं काही केलं की त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या सवयीला इतका वैतागला की त्याने थेट पोलीस ठाणं गाठलं. आईविरोधात त्याने पोलिसांकडे तक्रार केलीच पण सोबतच तिला तुरुंगात टाकण्याची मागणीही केली. हे वाचा - भाऊ-बहिणचा लपंडाव… पण एक ट्रीक आणि चिमूकली आऊट, क्यूट Videoनं नेटकऱ्यांना लावलं वेड व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटासा मुलगा पोलीस ठाण्यात दिसतो आहे. खुर्चीत बसलेल्या महिला पोलिसाकडे तो तक्रार देतो आहे. पोलिसाच्या हातात एक कागद आहे, त्यावर तो आपल्या आईबाबत आपली तक्रार लिहितो आहे. पोलीस त्याला त्याचं नाव, आईचं नावही विचारताना दिसतात. आता या इतक्याशा मुलाची आपल्या आईविरोधात काय बरं तक्रार असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील देडतलाई गावातील हा मुलगा. मुलाची आई त्याला अंघोळ घालत होती. तेव्हा तो मस्ती करत होता. पाणी सगळीकडे उडवत होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला मारलं. तो रडू लागला आणि त्याला इतका राग आला की वडिलांकडे त्याने आईची तक्रार केली. तो तितक्यावरच थांबवा नाही तर वडिलांना खेचत घेऊन तो पोलिसात गेला. हे वाचा - हसावं की रडावं! ‘लग्न म्हणजे काय?’ परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर वाचून चक्रावून जाल मुलाने तक्रार दिली की, “मम्मी मला नेहमी मारते, घाबरवते. मला खेळणी घेऊन देत नाही आणि माझ्या सर्व वस्तू, चॉकलेट, बिस्किट इ. चोरून स्वतःच खाते. स्वतः मला पैसे देत नाही आणि पप्पा पैसे देतात तेसुद्धा स्वतःकडे ठेवते. तिला आताच जेलमध्ये टाका”
मुलाची ही क्युट तक्रार ऐकून पोलीसही त्याचं म्हणणं ऐकण्यापासून आणि त्याची तक्रार नोंदवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. हसत हसत त्यांनी त्याची तक्रार लिहून घेतली आणि आपण लवकरात लवकर कारवाई करू असं या चिमुकल्याला दिलं.