मुंबई, 09 फेब्रुवारी : जादूचे (magic) प्रयोग पाहायला कुणाला आवडत नाही. आजवर तुम्ही असे बरेच जादूचे खेळ पाहिले असतील. भले भले मॅजिशिअन (magician) म्हणजेच जादूगार यांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर (social media) एका अशा जादूगाराचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. किंबहुना अशी भन्नाट जादू तुम्ही कधी पाहिलीच नसेल.
सोशल मीडियावर हा जादूगार बराच प्रसिद्ध झाला आहे. @iankitvora या ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला. चला यांना आणखी प्रसिद्ध करू. अमेझिंग टॅलेंट. असं म्हणत त्यांनी #IncredibleIndian देखील वापरलं आहे.
व्हिडीओत पाहू शकता हे काका एका बॉल आणि नाण्यानं जादू करताना दिसता. सुरुवातीला त्यांच्या हातात एक छोटासा लाल बॉल आहे. काका तो बॉल आधी तोंडात टाकतात मग हातात घेतात पण त्यांच्या हातात तो बॉल नसतो. पण तोच बॉल ते नाकातून बाहेर काढतात. नंतर तो बॉल हातात धरून तोंडातून आणखी एक दुसरा बॉल बाहेर काढतात तो दुसऱ्या हातात घेतात पण त्या हातातून दुसरा बॉलही गायब होतो. मग ते पहिला बॉल आधी शर्टाच्या खिशात टाकतात आणि मग पँटच्या खिशात टाकतात दोन्ही वेळा ते तोंडातून हा बॉल बाहेर काढतात. त्यानंतर तोंडातून आणखी एक बॉल बाहेर काढतात.
हा व्हिडीओ शूट करणारे लोक त्यांना आणखी काहीतरी जादू करायला सांगतात. तेव्हा काका आपल्या खिशातून एक नाणं बाहेर काढतात. हे नाणं ते आपल्या एका डोळ्यात टाकतात आणि दुसऱ्या डोळ्यातून बाहेर काढतात. फक्त आपल्यासोबतच नाही तर आपल्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीवरदेखील ते अशीच जादू करतात. त्या व्यक्तीच्या पोटात नाणं टाकतात आणि त्याच्या कानातून बाहेर काढतात. त्यानंतर तेच नाणं आपल्या हातात घेऊन तोंडात टाकतात आणि पोटातून बाहेर काढतात.