मुंबई, 5 सप्टेंबर: अनेकजण सध्या पाळीव कुत्र्यांना (Pet Dogs) कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवतात. इतकंच काय तर कुत्र्यांची निगा राखण्यासाठी महिन्याकाठी विशिष्ट बजेटही ठरवलेलं असतं. कुत्र्यांच्या खाण्या-पिण्यासह त्यांची नियमित आरोग्य चाचणीही केली जाते. परंतु, कुत्र्याची काळजी घेणाऱ्या एका मालकाला मोठा भुर्दंड बसला आहे. कुत्र्याचे दात स्वच्छ (Dog Teeth Cleaning) करायला त्याला क्लिनिकमध्ये घेऊन गेला असताना मालकाच्या हाती चक्क 5 लाख रुपयांचं बिल थोपवण्यात आलं. हा प्रकार पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. कुत्रा पाळण्याचा ट्रेंड सध्या प्रचंड वाढला आहे. कुत्र्यांच्या देशी-परदेशी अशा असंख्य जाती आहेत. काही हजारांपासून ते लाखांच्या पुढे त्यांच्या किमती असतात. कुत्रं पाळण्याची आवड असणारे लोकं (Dog Lovers) त्यांना आवडणाऱ्या जातीचे कुत्रे पाळण्यासाठी अगदी वाटेल ती किंमत मोजतात. घरात एखादा उत्तम ब्रीडचा कुत्रा आणला की, कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते. काही जण तर त्याच्या खाण्यापिण्याची बडदास्त राखतात आणि शिस्त लावण्यासाठी ट्रेनरचीही मदत घेतात. त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी पशुवैद्यकीय (Veterinary Doctor) तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो. महिन्याच्या विशिष्ट तारखेला किंवा त्यांची प्रकृती व्यवस्थित नसेल तेव्हा कुत्र्यांच्या क्लिनिकमध्ये कुत्र्यांना नेलं जातं. अशाच एका व्यक्तीने ‘रेडिट’वर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. आपल्या 12 वर्षे वय असलेल्या पाळीव कुत्र्याचे दात स्वच्छ करायचे असल्याने ती व्यक्ती कुत्र्याला सोबत घेऊन क्लिनिकमध्ये गेली. तेव्हा सर्वप्रथम कुत्र्याला बेशुद्ध केलं गेलं. काही वेळाने ही प्रक्रिया त्यांना थांबवावी लागली. त्यानंतर कुत्र्याच्या वैद्यकीय चाचण्या (Medical Test) केल्या गेल्या. यात कार्डिअॅक स्क्रिनिंग आणि रक्ताच्या चाचण्यांचा समावेश होता. सर्वकाही व्यवस्थित आहे हे समजल्यानंतर त्यांनी प्रक्रिया पुन्हा सुरू केली. कुत्र्याला कॅन्सर तर नाही ना याची खात्री करण्यासाठी काही दात काढले व त्यांना बायोप्सी (Biopsy) करण्यास पाठवले. याच्या आधी त्यांनी कुत्र्याच्या तोंडाचा एक्स-रे सुद्धा केला होता. या सगळ्याचं बिल 5 लाख रुपये झालं. **हेही वाचा:** हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य? दरम्यान, मोठ्या शहरांमध्ये पाळीव कुत्र्यांवर जीवापाड प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे कुत्र्याला काही होऊ नये तो ठणठणीत राहावा म्हणून लागेल तेवढे पैसे ते खर्च करण्याची तयारी दर्शवतात. पण रेडिटवर पाळीव कुत्र्याच्या मालकाने सांगितलेल्या अनुभवामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रातही उपचारांसाठी कसे अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात याची प्रचिती येते. कुत्र्याचे दात स्वच्छ करायला 5 लाखांचं बिल भरणाऱ्या व्यक्तीची फजिती वाचून त्याच्या कुटुंबीयातही ती व्यक्ती चेष्टेचा विषय ठरली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.