Home /News /viral /

'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण...

'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण...

या गावातले लोक चालता-बोलता अचानक केव्हाही, कुठेही झोपी जातात. ही गोष्ट ऐकायला काहीशी अजब वाटली तरी ती खरी आहे. विशेष म्हणजे या झोपेच्या आजारामागं नेमकं काय कारण आहे, हे अद्याप शास्त्रज्ञांना देखील समजलेलं नाही.

नवी दिल्ली, 10 मे : जगातल्या प्रत्येक देशात वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा, चाली-रिती, धार्मिक, सामाजिक गोष्टी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे प्रत्येक स्थळाची, गावाची एक खास ओळख (Identity) असते. भलेही ती काहीशी विचित्र असेल; पण अशा खास गोष्टींमुळे संबंधित गाव चर्चेत येतं. कलाची हे गाव त्यापैकीच एक होय. या गावाची विशिष्ट आणि काहीशी विचित्र अशी ओळख आहे. या गावातले लोक चालता-बोलता अचानक केव्हाही, कुठेही झोपी जातात. ही गोष्ट ऐकायला काहीशी अजब वाटली तरी ती खरी आहे. आता अशी स्थिती नसली तरी यामुळे या गावाची वेगळी ओळख नक्कीच निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या झोपेच्या आजारामागं (Sleeping Disorder) नेमकं काय कारण आहे, हे अद्याप शास्त्रज्ञांना देखील समजलेलं नाही. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. कझाकिस्तानमधलं (Kazakhstan) कलाची (Kalachi) हे गाव एका विचित्र आजारासाठी (Weird Disease) ओळखलं जातं. या गावातले लोक अनेक महिने झोपलेले असायचे. त्यामुळे या गावाला स्लीपी हॉलो (Sleepy Hollow) असं देखील म्हटलं जातं. या गावात कधीही कुणी गेलं तरी येथील लोक झोपलेलेच दिसायचे. ग्रामस्थांच्या विचित्र सवयीवर किंवा आजारावर आतापर्यंत अनेकवेळा संशोधन करण्यात आलं आहे. पण संशोधनातून या मागचं ठोस कारण समोर येऊ शकलेलं नाही.

हे वाचा - भारतातलं असं ठिकाण जिथे नैसर्गिकपणे तयार झालाय देशाचा नकाशा, पाहा 2 नद्यांच्या संगमावरचा 'भारत'

कलाची गावातले लोक अचानक आणि दीर्घकाळ झोपी जाण्यामागं एक कारण सांगितलं जातं. या भागात युरेनियम (Uranium) हा विषारी वायू (Toxic Gas) उत्सर्जित होतो. त्यामुळे या भागातल्या लोकांमध्ये झोपेचा हा विचित्र आजार दिसून आला. विषारी वायूमुळे या भागातलं पाणीदेखील प्रदूषित झालं आहे. या भागातलं पाणी कार्बन मोनोऑक्साईड मिश्रित आहे. त्यामुळे या भागातले लोक अनेक महिने झोपलेले असतात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. परंतु, या विचित्र आजारामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कलाची गावातले लोक अचानक झोपी जात असल्याचं पहिलं प्रकरण 2010 मध्ये समोर आलं. एका शाळेतली काही मुलं अचानक जमिनीवर कोसळली आणि झोपी गेली. हळूहळू हा आजार संपूर्ण गावात पसरला. ही गोष्ट अन्य भागांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या गावात शास्त्रज्ञ दाखल झाले आणि संशोधन करू लागले. पण सर्व प्रयत्न करूनही शास्त्रज्ञांना या रहस्याची पूर्णपणे उकल करता आली नाही. `डेली मेल`च्या एका रिपोर्टनुसार 2015 मध्ये हा आजार अचानक संपुष्टात आला आहे. या आजारामुळे कझाकिस्तानमधील कलाची हे गाव जगभरात नक्कीच चर्चेत आलं. पण झोपेच्या या आजारामागं नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
First published:

Tags: Sleep

पुढील बातम्या