नवी दिल्ली, 27 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते नेमके कोणत्या ठिकाणचे, कधी काढलेले हे सांगणं कठिण असतं. आता अंतराळातून भारताचे दिसणारे विहंगम दृश्य नासाने शेअर केलं आहे. यामध्ये दिवसाचा दिसत असलेला भारताचा फोटो जुना आहे. अंतराळवीर 24 तासात दिवस-रात्रीतून 16 वेळा प्रवास करतात. त्यानंतर रात्र आणि दिवसाचा वेगळाच नजारा कैद करण्यात ते यशस्वी होतात.
रात्रीच्या वेळी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून घेतलेला हा फोटो एकदम स्पष्ट दिसते. यामध्ये भारतातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती दिसते. शहरांना जोडणारे महामार्गही दिसतात. दक्षिण किनारपट्टी आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीचे स्पष्ट चित्र दिसते. तसेच ढगाने वेढलेलं चित्रही बघायला मिळतं.
भारताचा रात्रीच्या अंधारातला फोटो अलिकडचा आहे तर दिवसाचा फोटो सप्टेंबर 1966 मध्ये टिपलेला आहे. जेमिनी 11 स्पेसक्राफ्टच्या कॅमेऱ्याने तो टिपला होता. यामध्ये समुद्र किनारा, जमीन यांचा रंग दिसतो पण भौगोलिक परिस्थिती नीट दिसत नाही. भारत आणि लंकेच्या वर अवकाशात पांढरे ढग दाटल्याचंही दिसतं.
फोटोग्राफ S66-54677 हा 14 सप्टेंबर 1966 मध्ये टिपण्यात आला होता. तर दुसरा फोटो 12 जानेवारी 2015 ला काढण्यात आला आहे. दोन्ही फोटो नासाने शेअर केले असून ते क्रॉप करण्यात आले आहेत. तसेच ते नीट दिसावेत यासाठी झूमही केले आहेत.